Vidarbha Vidhan Sabha Election 2024: विदर्भात सर्वच प्रमुख राजकीय पक्षात झालेली बंडखोरी शमवण्यासाठी नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. त्यात त्यांना काही ठिकाणी त्यांना यश आले. पण, अनेक ठिकाणी बंडखोरी टाळता आली नाही. त्यामुळे महायुतीत काही ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) तर महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाविरुद्ध काँग्रेस अशी बंडखोरी झाली आहे. बंडखोरांमध्ये माजी मंत्री, माजी खासदार व अनेक माजी आमदारांचा समावेश आहे. अकोला पश्चिममध्ये वंचितचे अधिकृत उमेदवार डॉ. झिशान हुसेन यांनी माघार घेतल्याने पक्षाला धक्का बसला. अखेरचे वृत्त हाती आले तोपर्यंत विदर्भात १८ ठिकाणी महायुती, आघाडीमध्ये बंडखोरी झाल्याची माहिती होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चेत अडथळा ठरलेल्या रामटेकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उमेदवाराविरुद्ध काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांनी अर्ज कायम ठेवला आहे. ते बॅट चिन्ह घेऊन लढणार आहेत. अकोला पश्चिममध्ये वंचितचे अधिकृत उमेदवार डॉ. झिशान हुसेन यांनी माघार घेतल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा : शिवसेना, धनुष्यबाण ही शिवसेनाप्रमुखांची मालमत्ता; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीत महायुतीमधील भाजप बंडखोर अम्ब्रीशराव आत्राम यांनी अर्ज कायम ठेवला आहे. येथे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे विद्यामान मंत्री धर्मरावबाबा आत्राम रिंगणात आहेत. पूर्व नागपूरमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार विद्यामान आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी बंडखोरी केली आहे.

काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांच्या विरुद्ध काँग्रेसचे याज्ञवल्क्य जिचकार हे रिंगणात आहेत. बुलढाण्यातील शिंदे गटाचे विद्यामान आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध बंड करणारे भाजप नेते व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी अखेर माघार घेतली. त्यामुळे आमदार गायकवाड यांचे पुत्र कुणाल यांनी चिखलीत भाजप उमेदवाराविरुद्ध केलेले बंडही शमले आहे. त्यांनी अर्ज मागे घेतला आहे.

माघार घेणारे प्रमुख उमेदवार

आर्वी – विद्यामान आमदार दादाराव केचे (भाजप), बुलढाणा – भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे, चिखली – कुणाल गायकवाड, काँग्रेसचे बंडखोर हरीश रावळ (मलकापूर) उमरेड- माजी आमदार राजू पारवे (शिंदे सेना), यवतमाळ – संदीप बाजोरिया (मविआ), आर्णी – डॉ. विष्णू उकंडे (महायुती)पुसद – ययाती नाईक, गडचिरोली – भाजप आमदार होळी, राजुरा – भाजप माजी आमदार अॅड. संजय धोटे व सुदर्शन निमकर , बल्लारपूर – शिवसेना जिल्हा प्रमुख (ठाकरे) संदीप गिरे, देवरी-मविआचे आमदार सहेसराम कोरेटी, मेळघाट – भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, अचलपूर – भाजपच्या अक्षरा लहाने, नंदकिशोर वासनकर, दर्यापूर – काँग्रेसचे बंडखोर उमेदवार गुणवंत देवपारे, रामेश्वर अभ्यंकर, अकोला पूर्व – काँग्रेसचे डॉ. सुभाष कोरपे, मूर्तिजापूर- ठाकरे गटाचे महादेव गवळे, वंचितच्या पुष्पा इंगळे, कारंजा- काँग्रेसचे देवानंद पवार यांनी माघार घेतली.

हेही वाचा : मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

महायुतीत मैत्रीपूर्ण लढत

सिंधखेडराजा मतदारसंघात शिंदे गटाचे शशिकांत खेडेकर, अजित पवार गटाचे मनोज कायंदे व मविआकडून राजेंद्र शिंगणे अशी लढत होणार आहे. महायुतीतील दोन घटक पक्ष परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.

रिंगणातील प्रमुख बंडखोर

१)रिसोड -माजी मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख, २)रामटेक -राजेंद्र मुळक (काँग्रेस), ३)अहेरी -अम्ब्रीशराव आत्राम (भाजप),४) हिंगणघाट -राजू तिमांडे (राष्ट्रवादी श.प) , ५)अमरावती – माजी मंत्री जगदीश गुप्ता (भाजप), ६) बडनेरा -तुषार भारतीय (भाजप), प्रीती बंड (ठाकरे गट), ७)आरमोरी माजी आमदार आनंदराव गेडाम (काँग्रेस). श्८) काटोल-याज्ञवल्क्य जिचकार, ९) पूर्व नागपूर -आभा पांडे (अजित पवार),१०) चंद्रपूर -ब्रीजभूषण पाझारे (भाजप),११) वरोरा -डॉ.चेतन कुटेमाटे (काँग्रेस), मुकेश जीवतोडे (ठाकरे गट) १२) बल्लारशा -डॉ. अभिलाषा गावतुरे (काँग्रेस), प्रकाश पाटील मारकवार (काँग्रेस), १३ अर्जूनी मोरगाव- अजय लांजेवार (काँग्रेस) १४) देवरी आमगाव- शंकर मडावी (भाजप) १५) मध्य नागपूर -रमेश पुणेकर (काँग्रेस) १६) साकोली-सोमदत्त करंजेकर (भाजप), १७) तुमसर -अनिल बावनकर (राष्ट्रवादी श.प.) १८) भंडारा -नरेंद्र पहाडे (ठाकरे गट)

हेही वाचा : ‘बविआ’कडे शिट्टी चिन्ह कायम; उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

राणांच्या विरोधात भाजपचे बंड

अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजप नेते तुषार भारतीय यांनी बंड केले आहे. विशेष म्हणजे, भाजपने ही जागा राणा यांच्यासाठी सोडली होती व राणा यांच्या पत्नी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. दर्यापूर मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात राणा यांच्या युवा स्वाभिमानचे रमेश बुंदिले रिंगणात आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha rebel at 18 vidhan sabha constituencies print politics news css