नागपूर : स्वपक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेऊन बंडाचा झेंडा फडकावणाऱ्या राजकारणातील प्रभावी बड्या चेहऱ्यांनी यंदा वंचित बहुजन आघाडीकडे पाठ फिरवली आहे. यामुळे राजकारणातील वंचितचे आकर्षण संपले काय ? असा सवाल केला जात आहे.
वंचित घटकांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांंनी वंचित बहुजन आघाडी पक्ष स्थापन केला. या पक्षाची ही दुसरी विधानसभा निवडणूक आहे. या पक्षाने प्रारंभीच्या निवडणुकीत चांगली मते घेतली. त्यामुळे पक्षाचे नाव सर्वत्र झाले. परंतु राज्यातील प्रमुख पक्षांनी उमेदवारी नाकारल्यानंतर त्या पक्षाचे नेते वंचित बहुजन आघाडीच्या आश्रयाला जात असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले. ॲड. आंबेडकर हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि राजकीय प्रभाव असणाऱ्यांना उमेदवारी देतात आणि त्याद्वारे मतविभाजन घडवून आणतात, असा आरोप आंबेडकरांवर झाला. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाची मतांची टक्केवारी घटली. त्याचा परिणाम त्यांच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांच्या संख्येवरही झाला आहे. या पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छूक राजकारणातील बड्या चेहऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
वंचितकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या घटली
यंदा या पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मागणाऱ्यांमध्ये अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील तीन इच्छुक आहेत. राज्यात इतर कोणीही या पक्षाला उमेदवारी मागितली नाही. शिवाय ज्या तीन इच्छुकांनी वंचितला उमेदवारी मागितली, त्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. मध्य नागपूरमधून अनिस अहमद काँग्रेसकडून इच्छुक होते. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यानंतर त्यांनी ॲड. आंबेडकर यांच्याकडे धाव घेतली. मात्र, नाट्यमय घडामोडीनंतर ते अर्ज दाखल करण्यास असमर्थ ठरले. त्यांना अर्ज भरण्यासाठी जाण्यास एक मिनिटांचा विलंब झाला.
काँग्रेसचे माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र डॉ. झिशान हुसेन यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यानंतर त्यांनी वंचित आघाडीकडून अकोला पश्चिममधून तर काँग्रेसचे माजी मंत्री दिवंगत बाबासाहेब धाबेकर यांचे पुत्र सुनील धाबेकर यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते वंचितकडे गेले तेथे त्यांना संधी दिली आहे.
हे ही वाचा… मुख्यमंत्र्यांची साथ आमदार गीता जैन यांना ठरली मारक ?
वंचितचे आकर्षण संपले ?
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांना उमेदवारी नाकारली. म्हणून त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे समजल्यावर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. पण, वंचित बहुजन आघाडीला साधे विचारले सुद्धा नाही. अशाच प्रकारे चंद्रपूरचे विद्यमान अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली. परंतु त्यांच्याकडून नकार मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसला साद घातली. त्यांच्याकडूनही उमेदवारीबाबत निश्चित काही सांगितले गेले नाही. म्हणून त्यांनी पुन्हा अपक्ष लढण्याची तयारी केली. मात्र, त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली नाही.
© The Indian Express (P) Ltd