वर्धा : आर्वी मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार व बंडखोरीची गर्जना करणारे दादाराव केचे यांची समजूत घालण्यासाठी भाजपने प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर केला. त्यांना थेट अहमदाबादला नेत केंद्रीयमंत्री अमित शहा यांची भेट घालवून देण्यात आली. तेथे झालेल्या चर्चेनंतर केचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात महायुती, विशेषत: भाजपमध्ये झालेली बंडखोरी पक्षासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वीतील बंडखोर उमेदवाराची समजूत घालण्यासाठी थेट चार्टर्ड विमानाचा वापर करण्यात आला. आर्वीतील बंडखोर उमेदवार व विद्यमान आमदार दादाराव केचे यांना चार्टर्ड विमानाने अहमदाबाद येथे नेण्यात आले. त्यांची पक्षाचे नेते व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घालून देण्यात आली. त्यानंतर केचे माघारीसाठी तयार झाले.

हेही वाचा – Jayant Patil : ‘सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना १० वर्षे ब्लॅकमेल केलं’; त्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा का होती? जयंत पाटलांचा मोठा दावा

पक्षाचे अधिकृत उमेदवार सुमित वानखेडे यांना निवडून आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार, अशी हमी केचे यांनी शनिवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, केचे यांचे सहकारी आर्वी बाजार समितीचे अध्यक्ष संदीप दिलीप काळे, प्रभारी सुधीर दिवे उपस्थित होते. यावेळी पार्श्वभूमी नमूद करताना सुधीर दिवे म्हणाले की, शुक्रवारी पक्षनेते व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा निरोप आला. त्यानुसार शनिवारी सकाळी चार्टर्ड प्लेनने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केचे, संदीप काळे व मी स्वत: अहमदाबादला गेलो. तिथे केचे व शहा यांची भेट झाली. केचे यांचा पक्षात सन्मान आहे व पुढेही राहणार अशी हमी मिळाली. केचे यांनी यापुढेही पक्षाचा निष्ठावंत सैनिक म्हणून काम करणार अशी खात्री दिली.

हेही वाचा – अमरावती जिल्‍ह्यात जुन्‍या-नव्‍या चेहऱ्यांचा संघर्ष!

दादाराव केचे आपली भूमिका मांडताना म्हणाले, की १९८३ पासून मी आर्वीत पक्षाचे काम करणे सुरू केले. आमदार झालो. यावेळी पण तिकीट देण्याचे आश्वासन मिळाले होते. पण काही अडचण आल्याने ते पूर्ण झाले नाही. म्हणून अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला. पण प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वारंवार अर्ज परत घेण्याची विनंती केली. अमित शहा यांच्याकडे जावून अन्यायाचे निराकरण करू, असे आश्वासित केले. शहा यांच्या भेटीनंतर धीर आला. पक्ष जे म्हणेल तेच करण्याचे ठरवले. कार्यकर्ते निराश झाले पण त्यांची समजूत काढू. मला पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळाली. पुढे विधान परिषदेवर पण संधी मिळू शकते. कुणाच्या (सुमित वानखेडे) हाताखाली काम करावे लागणार, असा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election 2024 arvi constituency dadarao keche rebellion bjp chartered plane amit shah visit print politics news ssb