छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये भाजप २०, शिवसेना (एकनाथ शिंदे) १६ आणि अजित पवार नऊ मतदारसंघांत आणि राष्ट्रीय समाज पक्ष एक असे लढतीचे पक्षीय बलाबल आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष दहा जागा लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष १५ व शिवसेना उद्धव ठाकरे १६ जागांवर लढत आहे. काँग्रेस बीड, हिंगोली जिल्ह्यात एकही जागा लढवत नाही. संभाजीनगर, जालना, धाराशिव या जिल्ह्यांत राष्ट्रवादीची (अजित पवार) पाटी कोरी राहिली.

मराठवाड्यातील पाच मंत्र्यांच्या मतदारसंघात फुटीच्या पक्षात झुंज लागलेली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असे चित्र वरवर दिसत असले तरी या मतदारसंघातील भाजपचे सर्व कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी प्रचार करत आहेत. मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाचे राहुल मोटे उतरणार की शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे रणजित ज्ञानेश्वर पाटील उतरणार हे अद्यापि ठरलेले नाही. मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात एमआयएमचे इम्तियाज जलील यांचे आव्हान असणार आहे. तर संजय बनसोडे यांच्या उदगीर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. तर अशीच लढत परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांचीही असेल.

हेही वाचा – बंडखोरांना थोपविण्यासाठी चर्चा, भेटींचे सत्र; वणी, उमरखेड, यवतमाळमध्ये बंडखोर माघार घेण्याची शक्यता नाही

मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आपला उमेदवार असावा असा प्रयत्न शरद पवार यांनी आवर्जून केला आहे तर भाजपने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. भाजपच्या लढतीमधील सहा जागा कमी झाल्या. शिवसेनाही वजा झाली.