गडचिरोली : मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पहिल्या यादीतच त्यांचा समावेश होता. परंतु या जागेवर काँग्रेस दावा सोडण्यास तयार नसल्याने महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे दिसून येत आहे. काँग्रेसकडून हणमंतू मडावी २९ ऑक्टोबरला नामनिर्देशन दाखल करणार आहेत.
आत्राम राजघराण्याचे वर्चस्व असलेल्या अहेरी विधानसभेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तसेच मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवीत वडिलांचा आव्हान दिले आहे. तर दुसरीकडे भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हे देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अहेरी विधानसभेत सद्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. या लढाईत आता काँग्रेसने उडी घेतली असून अहेरीवरील दावा सोडण्यासाठी नकार दिला आहे. काँग्रेसकडून हणमंतू मडावी हे इच्छुक आहेत. विरोधीपक्षनेते विजय वाडेट्टीवार मडावी यांच्या उमेदवारीसाठी सुरवातीपासूनच अग्रही होते. त्यामुळे महावीकास आघाडीच्या बैठकीत यावरून काँग्रेस आणि शरद पवार गटात जोरदार खडाजंगी झाली. परंतु शरद पवार यांनी भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर केल्याने वडेट्टीवार अधिकच आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर २९ ऑक्टोबरला हणमंतू मडावी विजय वडेट्टीवर यांच्या उपस्थितीत काँग्रेसकडून नामनिर्देशन दाखल करणार असल्याची माहिती आहे.
…तर काँग्रेसच्या विरोधात उमेदवार
अहेरीच्या जागेवरून महाविकास आघाडीत बरीच चर्चा झाली. यात शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले नाही. तरीसुद्धा शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसने उमेदवार उभा करण्याची तयारी चालवली आहे. ही बाब शरद पवार गटाच्या नेत्यांनी गंभीरतेने घेतली असून काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार दिल्यास इतर ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात आम्ही उमेदवार देऊ अशी भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम राहणार की दावा सोडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना विचारणा केली असता त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला.