डोंबिवली – डोंबिवली विधानसभा क्षेत्रात मोठ्या संख्येने एकगठ्ठा मतदार असूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याठिकाणी उमेदवार दिलेला नाही. याच मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार दिपेश म्हात्रे यांना साथ देऊ नका यासाठी मनसैनिकांना योग्य शब्दात समजही दिली गेल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते कमालीचे सावध झाले असून पाच वर्षांपूर्वी या भागात दबक्या आवाजात चर्चेत आलेले ‘सीपी’ ( चव्हाण-पाटील) समीकरण पुन्हा एकदा सक्रिय होते आहे का ही चर्चा सुरु झाली आहे.
भाजपचे ठाणे जिल्ह्यातील एकमेव मंत्री रविंद्र चव्हाण आणि मनसेचे राज्यातील एकमेव आमदार राजू पाटील यांची मैत्री कधीही लपून राहिलेली नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक एकसंघ शिवसेनेविरोधात लढत असताना २७ गाव आणि परिसरात रविंद्र चव्हाण यांनी भाजपच्या बाजूने वळविलेल्या राजकीय समिकरणात राजू यांचीही छुपी मदत राहिली होती. पाच वर्षांपूर्वी कल्याण ग्रामीणमधील विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची उमेदवारी बदलून एकसंघ शिवसेनेने रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना रिंगणात उतरविले होते. भोईर यांना एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांचा कडवा विरोध होता. ऐनवेळेस भोईर यांची उमेदवारी बदलली गेल्याने येथील राजकीय समिकरण राजू पाटील यांच्या बाजूने घडत गेले. या निवडणुकीत रविंद्र चव्हाण यांच्याशी सलगी ठेवून वागणारे २७ गाव तसेच आसपासच्या परिसरातील प्रभावी आगरी नेते तसेच भाजपचे काही पदाधिकारी राजू पाटील यांच्या मदतीला धावल्याची चर्चा अगदी उघडपणे सुरु होती. स्वत: चव्हाण आणि पाटील यांनी याविषयी कधीही जाहीरपणे चर्चा केली नसली तरी ग्रामीणमधील ‘सीपी’ (चव्हाण-पाटील) युतीची चर्चा शिंदे गोटात मात्र सतत सुरु होती. यंदाही डोंबिवली विधानसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार नसल्याने त्याचा परिणाम कल्याण ग्रामीणमध्येही दिसू शकेल अशी चर्चा आता उघडपणे सुरु झाली आहे.
हेही वाचा – वाशीम जिल्ह्यात तिरंगी-चौरंगी सामने; जातीय समीकरण, मतविभाजन कुणाच्या पथ्यावर?
कल्याण ग्रामीणमध्ये शिंदेसेना सावध
लोकसभा निवडणुकीत मनसेचे राजू पाटील यांनी डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम केले. त्याची परतफेड विधानसभेत केली जाईल अशी आशा राजू पाटील यांना होती. असे असताना शिंदे शिवसेनेने कल्याण ग्रामीणमध्ये शहरप्रमुख राजेश मोरे यांना उमेदवारी देऊन राजू पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले. या आव्हानामुळे पाटील-शिंदे यांच्यामधील वाद पुन्हा व्यक्तिगत पातळीवर सुरू झाला आहे. डोंबिवलीतही रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात श्रीकांत शिंदे यांचे एकेकाळचे समर्थक दिपेश म्हात्रे हे रिंगणात आहेत. म्हात्रे यांच्या उघड बंडखोरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चव्हाण समर्थकही यामुळे अस्वस्थ आहेत. डोंबिवलीत मनसेची ठराविक मते आहेत. डोंबिवलीतील सुशिक्षित, पांढरपेशा विभागातून मनसेला कमी-अधिक प्रमाणात मतदान होत आले आहे. यावेळी मनसेकडून प्रल्हाद म्हात्रे हे आगरी समाजातील वारकरी संप्रदायाशी जवळीक साधणारे नेतृत्व इच्छुक होते. म्हात्रे यांना मानणारा मोठा मतदार डोंबिवलीत पांढरपेशा वस्त्यांमध्येही आहे. त्यामुळे मनसेने याठिकाणी उमेदवार देणे टाळल्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मनसेकडून मिळालेल्या या ‘मदती’ची परतपेढ कल्याण ग्रामीणमध्येही होण्याची भीती आता शिंदेसेनेत दबक्या सुरात व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्ह्यात शिंदे पिता-पुत्रांचे राज्य अवतरल्यानंतरही चव्हाण यांना मानणारा एक मोठा वर्ग २७ गावे आणि आसपासच्या भागात आहे. पाच वर्षांपूर्वी जे झाले त्याची पुनरावृत्ती आता होणार नाही याची खात्री महायुतीत कुणालाही देता येणार नाही असे वातावरण पुन्हा असल्याने शिंदेसेनेचे नेते याठिकाणी बारीक लक्ष ठेवून आहेत.