शहापूर : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. पक्षाचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांमधून शिवसेनेच्या शाखांचे जाळे पक्के केले. भिवंडी ग्रामीण आणि लगत असलेल्या शहापूर पट्टयातही शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजलेली. दौलत दरोडा यांनी अनेक वर्ष येथे शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ घराघरापर्यत पोहचविले होते. मात्र गेल्या पाच वर्षात झालेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे यंदा पहिल्यांदाच शिवसेनेचे धनुष्यबाण शहापूरातून हद्दपार झाले आहे.
या मतदारसंघात आता राष्ट्रवादी काॅग्रेस(शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी काॅग्रेस (अजित पवार) अशी लढत होणार आहे. त्यामुळे अस्तित्त्वाच्या लढाईसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे पाठविले आहेत. तसेच येथून अविनाश शिंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असली तरी शहापूर पट्टयात एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाही स्थान मिळालेले नाही. त्यामुळे शिंदे यांच्या समर्थक असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहापूरात नेमकी कोणती भूमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहापूर या राखीव मतदारसंघातून दौलत दरोडा हे वर्षानुवर्षे शिवसेनेच्या वतीने निवडून येत असत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे पांडुरंग बरोरा यांनी दरोडा यांचा पाच हजार मतांच्या फरकाने पराभव केला. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असताना तेव्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि बरोरा यांचे सुर त्यावेळी जमले. २०१९ च्या निवडणुकीत बरोरा यांना शिंदे यांनी एकसंघ शिवसेनेत आणले. त्यामुळे शहापूरचे जुने जाणते शिवसैनिक संतापले. दरोडा यांनी बंडखोरी करावी असा आग्रह या शिवसैनिकांनीच त्यांच्यापुढे धरला. दरोडा यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या निवडणुकीत दरोडा यांनी बरोरा यांचा तब्बल १६ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. शिंदे यांचा डाव त्यांच्यावरच उलटला होता. बालेकिल्ल्यात केवळ उमेदवार चुकल्याने शिवसेनेला ही जागा गमवावी लागली आणि आता तर दोन्ही शिवसेना शहापूरातून हद्दपार झाल्या आहेत.
जागा वाटपात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शहापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या वाट्याला आला आहे. येथून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना रिंगणात उतरविले आहे. दरोडा येथे अजित पवार यांच्या गटात स्थिरावले आहेत. अजित पवार यांचे बंड झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस ते मोठया पवारांसोबतच राहीले. एकनाथ शिंदे आणि दरोडा यांच्यातही फारसे सख्य नाही. त्यामुळे काळाची पाउल ओळखून पुढे दरोडा अजित पवार यांच्या पक्षात गेले. याच पक्षातून आता ते निवडणुक रिंगणात आहेत. बदललेल्या या राजकीय गणितांमुळे शहापूरातून उद्धव आणि शिंदे अशा दोन्ही सेना मात्र रिंगणातून बाहेर फेकल्या गेल्या आहेत.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या शहापूर विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला नसल्याने ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे सादर केले. आम्ही शिवसेनेच्या अस्तित्वासाठी उमेदवार अविनाश शिंगे यांचा अर्ज दाखल केला असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख कुलदीप धानके यांनी पत्रकार परिषद मध्ये जाहीर केले. शहापुर तालुक्यात पंचायत समितीच्या २८ पैकी १८ जागा, जिल्हापरिषदेच्या १४ पैकी नऊ जागा तसेच तालुक्यातील ६० टक्के ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे प्रभुत्व असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास वेळोवेळी आणले असल्याचे जिल्हासचिव काशिनाथ तिवरे यांनी स्पष्ट केले.