अमरावती : भाजपने अखेर मेळघाट मतदारसंघातून केवलराम काळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्‍या काही दिवसांपासून महायुतीत या जागेवरून ताणाताणी सुरू होती. प्रहार जनशक्‍ती पक्षातून बाहेर पडल्‍यानंतर महायुतीतर्फे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातर्फे उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्‍या विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांच्‍यासाठी हा मोठा धक्‍का मानला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीत ही जागा भाजपकडे गेल्‍याने राजकुमार पटेल हे काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांना राजकुमार पटेल यांनी विरोध केला होता. त्‍यामुळे मेळघाटमधून त्‍यांना महायुतीची उमेदवारी मिळू नये, यासाठी नवनीत राणा यांनी जोरकस प्रयत्‍न केले. त्‍यात त्‍यांना यश आले.

मेळघाटमधून गेल्‍या निवडणुकीत राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडणूक लढवणारे केवलराम काळे हे त्‍यावेळी काँग्रेसमध्‍ये होते, त्‍यांना अनिच्‍छेने राष्‍ट्रवादीच्‍या चिन्‍हावर निवडणूक लढवावी लागली होती. त्‍यात त्‍यांचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीआधी केवलराम काळे यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला. केवलराम काळे यांच्‍या उमेदवारीच्‍या घोषणेनंतर भाजपमधून उमेदवारीसाठी इच्‍छुक असलेल्‍या नेत्‍यांमध्‍ये नाराजीचा सूर उमटला असताना बंडखोरीची शक्‍यता देखील वर्तवली जात आहे.

राजकुमार पटेल यांनी प्रहार जनशक्‍ती पक्षातून बाहेर पडल्‍यानंतर शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश करण्‍याच्‍या हालचाली सुरू केल्‍या होत्‍या. पण, त्‍यांना पक्षप्रवेश लांबत गेला. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या उपस्थितीत धारणी येथे मेळाव्‍याच्‍या आयोजनाची तयारी त्‍यांनी केली होती, पण मुख्‍यमंत्री त्‍या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. राजकुमार पटेल हे शिवसेनेची उमेदवारी मिळवण्‍यासाठी मुंबईत ठाण मांडून होते, पण त्‍यांना रिक्‍त हाताने परतावे लागेल.

हे ही वाचा… ‘अहेरी’वरून महाविकास आघाडीत बिघाडी? शरद पवार गटाविरोधात उमेदवार देण्यावर काँग्रेस ठाम

महाविकास आघाडीकडून अद्याप मेळघाटमध्‍ये उमेदवार जाहीर करण्‍यात आलेला नाही. राजकुमार पटेल हे काँग्रेसच्‍या संपर्कात असल्‍याची चर्चा सुरू झाली आहे. त्‍यांच्‍या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक निवडणुकांपासून मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे. १९९५ च्या निवडणुकीत भाजपचे पटल्या गुरुजी मावसकर हे मेळटातून निवडून आले. राजकुमार पटेल हे भाजपचे आमदार म्हणून १९९९ मध्ये विजयी झाले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर प्रभुदास भिलावेकर यांनी मेळघाटात कमळ फुलवले. २०१९ च्या निवडणुकीत राजकुमार पटेल हे बच्चू प्रहार पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आलेत. राजकुमार पटेल यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election 2024 for melghat assembly constituency bjp nominated kewalram kale setback to sitting mla rajkumar patel print politics news asj