Narendra Mehata in Mira Bhayander Assembly Constituency : बहुचर्चचित मिरा भाईंदर मतदार संघातून गीता जैन की नरेंद्र मेहता या वादात अखेर नरेंद्र मेहता यांनी बाजी मारली आहे. मंगळवारी सकाळी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने विद्यमान आमदार गीता जैन यांना डावलून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संतप्त आमदार गीता जैन पुन्हा अपक्ष निवडणूक लढवून भाजप आणि मेहता धूळ चरण्याचा निर्धार केला आहे. नरेंद्र मेहता यांच्या उमेदवारीसाठी भाजपचे प्रभावी नेते रवींद्र चव्हाण आग्रही होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिरा भाईंदर प्रतिनिधित्व अपक्ष आमदार गीता जैन करतात. जैन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपले समर्थन दिले होते. त्यामुळे जैन यांना हाताशी धरून शिंदे ही जागा शिवसेनेच्या पदरात पडून घेण्याचे प्रयत्न करत होते. तर महायुती तर्फे उमेदवारी मिळणार अशी आशा असल्यामुळे जैन यांनी देखील आपली तयारी पूर्ण केली होती. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आव्हान देत या जागेवर दावा केला होता. परिणामी शिंदे आणि फडणवीसांमध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरु होती.दरम्यान यावर निर्णय होत नसल्यामुळे जैन आणि मेहता यांनी भाजपसह अपक्ष उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केले होते.

अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवार म्हणून नरेंद्र मेहता यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. मेहता यांच्या नावाची वर्णी लावण्यासाठी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण अधिक प्रयत्नशील होते. तर हा भाजप कार्यकर्त्यांचा विजय असून आपण पूर्ण हिंमतीने निवडणूक लढवणार असल्याचा दावा मेहता यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यावर कुरघोडी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गीता जैन यांच्यासाठी प्रयत्नशील होते. कारण गीता जैन यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. ही जागा गीता जैन यांनाच मिळेल असे ठाम आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी करण्यास यशस्वी झाली आहेत. मुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून फडणवीस यांनी नरेंद्र मेहता यांनी उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे. नरेंद्र मेहता यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार गीता जैन मध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासाठी प्रयत्न केले. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन-चार वेळा शब्द देऊनही तो पाळला नसल्याचा आरोप जैन यांनी केला आहे. मेहता यांना धूळ चारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा… माघार घेणाऱ्या तनवाणींचा बोलविता धनी वेगळाच

हे ही वाचा… नाराजी : इकडे तिकडे चोहीकडे; चंद्रपूर जिल्ह्यात युती-आघाडीतील मित्रपक्षांत खदखद

महायुती मध्ये नाराजी

माजी आमदार नरेंद्र मेहता यांना भाजपमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुती मध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात भाजप मधील विधानसभा प्रमुख रवी व्यास गट यावर नाराज झाला असून निर्णयाचा विरोध करू लागला आहे. तर अजूनही व्यास यांनी यावर आपली भूमिका जाहीर केलेली नाही. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने या निर्णयाला संमती दर्शवलेली नाही. याशिवाय गीता जैन यांनी देखील बंड पुकारल्याने ही जागा निवडून आणणे महायुतीला आव्हानात्मक ठरणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election 2024 for mira bhayandar constituency assembly bjp give candidature to narendra mehta mla geeta jain sidelined print politics news asj