Sanjay Pandey : विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी २० सप्टेंबर रोजी खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संजय पांडे हे काँग्रेसकडून वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, संजय पांडे हे पोलीस सेवेत असताना एकेकाळी त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा देखील निघाला होता. तसेच धारावीतील रहिवाशांनी त्यांचे स्वागत देखील केले होते. महाराष्ट्राचे माजी डीजीपी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कारकिर्दीत अनेक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं होतं.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तसेच ते आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी देखील आहेत. पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आता संजय पांडे यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर संजय पांडे यांनी २००० सालीच निवडणूक लढवण्याबाबत विचार केला होता, असं सांगितलं जात आहे. संजय पांडे हे महाविकास आघाडी विशेषत: शिवसेना ठाकरे गटाच्या जवळचे मानले जात होते. पण आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा : मराठवाड्यात भाजपने कंबर कसली, अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक

संजय पांडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उत्तर भारतीयांची संख्या जास्त प्रमाणात असलेल्या वर्सोवा विधानसभेच्या जागेबाबत त्यांचं नाव चर्चेत आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या आधी संजय पांडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेची निवडणूक लढवण्याची देखील इच्छा व्यक्त केली होती.

संजय पांडे यांचे धारावीतील लोकांशी इतके चांगले संबंध होते की, ते पोलीस सेवेत कार्यरत असताना स्थानिकांनी त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. आजही त्यांना लोक धारावीचे पांडेजी म्हणून ओळखतात असं म्हटलं जातं. मुंबई काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचा बालेकिल्ला असलेल्या धारावीत त्यांची लोकप्रियता अधिक होती. खरं तर संजय पांडे यांची शिवसेना ठाकरे गटाशी जास्त जवळीक असल्याचं बोललं जातं. मात्र, तरीही त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची भूमिका घेतली.

दरम्यान, २००० साली संजय पांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यावेळी सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर ते पोलीस दलात रुजू झाले होते. दरम्यान, संजय पांडे यांनी २०२१ मध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि त्यानंतर मुंबई आयुक्त पदाचा कार्यभार पाहिला होता. त्यावेळी ते राज्यभर चर्चेतही आले होते. दरम्यान, पुढे पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाच महिने तुरुंगातही होते. तब्बल पाच महिन्यांनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. यानंतर आता संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते विधानसभा निवडणुक लढवण्याची शक्यता आहे.