भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रांमध्ये ७८ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली असून उमेदवारांची संख्या ६५ आहे. महाविकास आघाडी व महायुतीमधील नेत्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोरी अटळ राहिल्यास तीनही विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

भंडाऱ्यात ठाकरे गटाच्या नेत्याची बंडखोरी

या मतदारसंघात २५ उमेदवारांनी २९ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच होती. अखेर ही जागा काँग्रेसकडे खेचून आणण्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना यश आले. मात्र, अंतर्गत विरोधामुळे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र पहाडे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले. महायुतीत मात्र नरेंद्र भोंडेकर यांना प्रखर विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता मवाळ भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे भंडाऱ्यात शिवसेनेचे (शिंदे गट) नरेन्द्र भोंडेकर, अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे आणि काँग्रेसच्या पूजा ठवकर यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे दिते आहे.

हे ही वाचा… स्वपक्षातील बंडखोरांचे आव्हान थोपविण्यासाठी कसरत! महायुती आणि महाविकास आघाडीत नाराजांची मनधरणी सुरू

तुमसरमध्ये शरद पवार गटातील नेत्यांची वेगळी चूल

तुमसर विधानसभा क्षेत्रात १६ उमेदवारांनी २० अर्ज दाखल केलेत. येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीत थेट लढत होणार, असे वाटत असतानाच शरद पवार गटातील नेत्यांनी बंड पुकारत वेगळी चूल मांडली. ठाकचंद मुंगुसमारे, माजी आमदार अनिल बावनकर, माजी आमदार सेवक वाघाये यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे येथे शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर बंडखोरांचे तगडे आव्हान आहे.

साकोलीत भाजप नेते अपक्ष म्हणून रिंगणात

साकोली मतदारसंघात काँग्रेसच्या पटोलेंना शह देण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्याला उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावला. येथे पटोले, भाजपचे अविनाश ब्राह्मणकर आणि अपक्ष उमेदवार सोमदत्त करंजेकर यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे.

एकंदरीत तीनही मतदारसंघांत बंडखोरीला उधाण आले असून सर्वांचे लक्ष आता माघारीकडे लागले आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांचे बंड थोपवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भंडारा जिल्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृहजिल्हा असल्याने ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील बंडोबांची समजूत कशी घालतात, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. याचबरोबर, महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधातील बंड शमवण्यात भाजप नेत्यांना यश येणार, की बंड कायम राहणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader