चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने स्वतःकडे घेतल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), तर महायुतीत भाजपने सहा जागांवर उमेदवार दिल्याने शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी तीव्र नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात एक मतदारसंघ सुटला नाही तर राजीनामा देणार, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दिला होता. त्याचे काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, चिमूर व ब्रम्हपुरी असे सहा मतदारसंघ आहेत. या सहाही मतदारसंघांत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (ठाकरे) या दोन्ही पक्षांनी बल्लारपूर मतदारसंघावर दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, तर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे या दोघांनी उमेदवारी मिळावी, यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र, काँग्रेस ही जागा काही केल्या सोडायला तयार नव्हती. शिवसेना ठाकरे गटाने गिऱ्हे यांच्यासाठी ‘एबी फॉर्म’पाठविला, मात्र तो परत मागविण्यात आला. राष्ट्रवादीचे वैद्य यांनी तर बल्लारपूरची जागा सोडली नाही तर सर्व पदाधिकारी राजीनामे देतील, असा इशारा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला होता. आता एकही जागा सुटली नाही, त्यामुळे वैद्य राजीनामा देतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाने वरोरा या जागेवरही दावा केला होता. अखेर, ठाकरेसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडे जिल्ह्यातील वरोरा व ब्रम्हपुरी हे दोन मतदारसंघ होते. यंदा एकही मतदारसंघ नाही.
शिंदेंच्या शिवसेनेलादेखील जिल्ह्यातील एकही जागा मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षाने जिल्ह्यात एकाही मतदारसंघावर दावा केला नव्हता.
हे ही वाचा… Sangli Assembly Constituency : सांगलीत अजून एका घराण्यात दुहीची बिजे
अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्याची तयारी काँग्रेसने दाखविली होती. मात्र, स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व बौद्ध समाजातील बहुसंख्य बांधवांनी २०२९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. तेव्हा किमान आता तरी असा निर्णय घेऊ नका, अशी आग्रहाची विनंती केली. त्यामुळेच हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडला नाही. – विजय वडेट्टीवार, आमदार, काँग्रेस.