मुंबई : लोकसभा निकालानंतर ‘व्होट जिहाद’चा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल ३८ मतदारसंघांपैकी सर्वाधिक २१ मतदारसंघांमध्ये महायुतीला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे त्यातील १४ जागा भाजपने जिंकल्या आहेत.
राज्यातील ३८ विधानसभा मतदारसंघांमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लीम मतदार आहेत. यापैकी २१ मतदारसंघांत महायुतीला यश मिळाले. मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजप १४, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५, राष्ट्रवादी (अजित पवार) २ अशा २१ जागा महायुतीने जिंकल्या आहेत. काँग्रेस ५, शिवसेना (उद्धव ठाकरे) ६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ३ अशा १४ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. समाजवादी पक्षाने दोन आणि ‘एमआयएम’ने एक जागा मुस्लीमबहुल मतदारसंघात जिंकली.
हेही वाचा >>>नागपुरात मंत्रिपद शहराला की ग्रामीणला?
सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठी हार पत्करावी लागली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मुस्लीम समाजावर ‘व्होट जिहाद’चा आरोप केला होता. तसेच या विधानसभा निवडणुकीत हिंदूंनी धर्मयुद्ध पुकारावे, असे आवाहनही केले होते. या आरोपानंतरही मुस्लीमबहुल क्षेत्रात महायुतीने भाजपच्या १४ जागांसह एकूण २१ जागा जिंकल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला या क्षेत्रात ११ जागा मिळाल्या होत्या. महायुतीला मतांच्या विभाजनाचा फायदा झाला आहे. मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये एकापेक्षा अनेक मुस्लीम उमेदवार रिंगणात होते, त्याचाही फायदा झाला. त्याचेच उदाहरण म्हणजे अमरावती मतदारसंघात काँग्रेस आणि अपक्ष मुस्लीम उमेदवाराला जवळपास समान मते मिळाली. त्याचा फायदा महायुतीला झाला. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
राज्यात मुस्लीम समाजाची २०११ च्या जनगणनेनुसार ११.५६ टक्के लोकसंख्या (१ कोटी ३० लाख) आहे. भिवंडी पश्चिम ४९ टक्के, अंधेरी- पश्चिम २७ टक्के, वांद्रे -पश्चिम २६ टक्के, अकोट २७ टक्के, सोलापूर -मध्य २५ टक्के, नागपूर -मध्य मतदारसंघात २३ टक्के मुस्लीम मतदार आहेत. तरीसुद्धा या मतदारसंघात भाजपचे हिंदू उमेदवार विजयी झाले. आश्चर्य म्हणजे मुस्लीमबहुल मतदारसंघात विजयी झालेले भाजपचे उमेदवार २० ते ५० हजाराच्या मोठ्या फरकाने जिंकले आहेत.
हेही वाचा >>>ईव्हीएम विरोधात एकेकाळी रान उठविणारे चंद्राबाबू नायडू भाजपासह सत्तेत जाताच झाले शांत; भूमिकेत एवढा बदल कसा झाला?
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने (शिंदे) मुस्लीमबहुल मतदारसंघात ५, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या. भाजपने एकाही मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली नव्हती. शिंदे शिवसेनेने १ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ५ मुस्लीम उमेदवार दिले होते, तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी ११ मुस्लीम उमेदवार दिले होते. निवडणुकीत १० मुस्लीम उमेदवारांचा विजय झाला.
महायुतीने जिंकलेल्या मुस्लीमबहुल क्षेत्रातील जागा
● भाजप : भिवंडी- पश्चिम, औरंगाबद- पश्चिम, अंधेरी- पश्चिम, अकोट, वांद्रे -पश्चिम, सोलापूर -मध्य, धुळे -शहर, नागपूर मध्य, सायन- कोळीवाडा, कारंजा, पुणे कॅन्टोनमेंट, रावेर, वाशिम, मलकापूर.
● शिवसेना (एकनाथ शिंदे) : औरंगाबाद- पूर्व, कुर्ला, चांदीवली, नांदेड -उत्तर, नांदेड -दक्षिण
● राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : अमरावती, अणुशक्तीनगर
विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी लोकसभेप्रमाणे एकरेषीय मतदान केले नाही. त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पक्षाचे पर्याय होते. स्थानिक आमदार, बुथ प्रमुख, पक्ष पदाधिकारी यांच्या प्रभावातून मुस्लीम मतदान झाले. अनेक मतदारसंघात भाजप उमेदवारास मुस्लीमांचे मतदान पडले आहे.- सरफराज आरजू, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई