कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना उमेदवार ठरविताना दमछाक होईल हा राजकीय वर्तुळातील अंदाज फोल ठरला असून उलट मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचेच उमेदवार अजून ठरत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेने उमेदवार राजू पाटील यांच्या विरोधात शनिवारी रात्री उशीरापर्यत पक्षाचा उमेदवार ठरला नव्हता. कल्याण पश्चिमेत विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर, अंबरनाथचे बालाजी किणीकर यांनाही अजूनही रांगेत ठेवण्यात आले असून उद्धव सेनेने मात्र कल्याण पुर्वेत धनंजय बोडारे, पश्चिमेत सचिन बारसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यापाठोपाठ कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात डाॅ.श्रीकांत शिंदे दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करताना याठिकाणी शिंदे आघाडी घेतील, असा अंदाज बांधला जात होता. प्रत्यक्षात मात्र मतदारसंघातील दोन विद्यमान आमदार आणि कल्याण ग्रामीणसारख्या मोठी ताकद असलेल्या मतदारसंघातच पक्षाचे उमेदवार ठरत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोबिवली ( रविंद्र चव्हाण), कल्याण पुर्व (सुलभा गायकवाड) या दोन मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात भाजपचाही उमेदवार ठरत नसल्याचे चित्र आहे.

शिवसेनेची आघाडी

कल्याण पट्टयात उद्धव ठाकरे यांना उमेदवार मिळवताना दमछाक होईल, असा अंदाज राजकीय निरक्षकांकडून बांधला जात होता. असे असताना पहिल्या यादीत सुभाष भोईर ( कल्याण ग्रामीण) आणि राजेश वानखेडे (अंबरनाथ) या दोन मतदारसंघात उद्धव सेनेने आपले उमेदवार जाहीर केले. शनिवारी सकाळी कल्याण पुर्व मतदारसंघात धनंजय बोडारे आणि पश्चिमेत सचिन बारसे यांची उमेदवारी जाहीर करुन उद्धव सेनेने ही लढत चुरशीची होईल अशापद्धतीने पाउले उचलली आहे. पाच वर्षांपुर्वी झालेल्या निवडणुकीत बोडारे हे गणपत गायकवाड यांच्या विरोधात अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यावेळी त्यांचा १२ हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी एकसंघ शिवसेनेची ताकद त्यांच्यामागे नसली तरी गायकवाड यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फायदा ते कितपत उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कल्याण पश्चिमेत विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे येथे रवी पाटील यांना रिंगणात उतरवावे का याविचारात शिंदेसेनेचे नेते आहेत. येथे भाजपचे नेते नरेंद्र पवार बंडाची भाषा यापुर्वीच बोलू लागले आहेत. येथे सचिन बारसे या अभ्यासू माजी नगरसेवकाला रिंगणात उतरवून उद्धव सेनेने चांगला डाव टाकला आहे. या मतदारसंघात साईनाथ तारे यांचे नाव सुरूवातीला घेतले जात होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election 2024 uddhav thackeray candidate announced in kalyan belt yet not decided by eknath shinde print politics news asj