नागपूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातून निवडून गेलेल्या ६२ पैकी ३७ आमदार हे ओबीसी प्रवर्गातील आहेत. यात सर्वाधिक वाटा अर्थात भाजपचा असून त्याखालोखाल इतर पक्षांचा आहे.
विदर्भात विधानसभेच्या एकूण ३२ जागा आहेत. त्यात पूर्व विदर्भात ३२ तर पश्चिम विदर्भातील ३० जागाचा समावेश आहे. ओबीसीबहुल असलेल्या या भागात पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्वविदर्भात ओबीसींचे प्रमाण अधिकआहे. लोकसभा निवडणुकीत हा समाज महाविकास आघाडीच्या मागे भक्कमपणे उभा राहिल्याने महायुतीला फटका बसला होता. नागपूर वगळता महायुतीने जिंकलेल्या दोन जागा या मतविभाजनामुळे जिंकल्या होत्या.मतविभाजन टळले असते तर महायुतीफक्त नागपूरचीच जागा जिंकू शकली असती. यावरून ओबीसी एकवटण्याची तीव्रता किती होती हे यावरून लक्षात येते. त्यामुळे विधानसभेतही हेच चित्र कायम राहिल की बदलेल याबाबत साशंकता होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातून ओबीसींनी महायुतीला घसघशीत मतदान केल्याचे दिसून येते. निवडून आलेल्या ६२ उमेदवारांपैकी ३७ हे इतर मागासवर्गीय (ओबीसी ) आहेत. यात सर्वपक्षीय उमेदवारांचा समावेश आहे. भाजपचा वाटा त्यात अधिक आहे.
विदर्भातील एकूण ६२ पैकी १२ जागा अनुसूचित जातीसाठी तर ५ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. उर्वरित ४५ जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये ३७ ओबीसी (८० टक्केहून अधिक ) आहेत. यात सर्वाधिक २७ भाजपचे, ४ राष्ट्रवादीचे (अजित पवार) ३ काँग्रेस,२ शिवसेना ठाकरे गटाचे तर एक शिवसेना शिंदे गटाचा आहे. महायुतीचा म्हणून विचार केल्यास त्यांचे ३२ व महाविकास आघाडीचे पाच ओबीसी उमेदवार आहेत. निवडणुकीतील ओबीसींचा कल लक्षात घेता हा समाज पुन्हा भाजपकडे वळलेला दिसून येतो.
आणखी वाचा-बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसच्या पराभवाने मुकुल वासनिक यांची दिल्ली दरबारी अडचण!
ओबीसी आमदार
वाशीम जिल्हा – सई डहाके (भाजप), अमीत झनक (काँग्रेस, अमरावती जिल्हा -रवी राणा (भाजप समर्थित) ,राजेश वानखेडे, केवलराम काळे, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, उमेश यावलकर (सर्व भाजप) सुलभा खोडके (राष्ट्रवादी अजित पवार). यवतमाळ जिल्हा -संजय देरकर (शिवसेना-ठाकरे), अनिल मंगळुरकर (काँग्रेस), संजय राठोड (शिवसेना -शिंदे), इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी-अजित पवार). बुलढाणा जिल्हा – आकाश फुंडकर, डॉ. संजय कुंटे, श्वेता महाले (सर्व भाजप), मनोज कांयदे (राष्ट्रवादी -अजित पवार). अकोला -प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर (दोन्ही भाजप), नितीन देशमुख ( शिवसेना -ठाकरे). नागपूर -आशीष देशमुख, समीर मेघे,मोहन मते, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, चंद्रशेखर बावनकुळे, आशीष देशमुख (सर्व भाजप) विकास ठाकरे. वर्धा-पंकज भोयर, सुमीत वानखेडे, राजेश बकाणे (सर्व भाजप), चंद्रपूर- देवराव भोंगळे, करण देवतळे,(दोन्ही भाजप) विजय वडेट्टीवार (काँग्रेस), गोंदिया -विजय रहांगडाले (भाजप), राजू कारेमोरे ( राष्ट्रवादी -अजित पवार) , नाना पटोले (काँग्रेस )