मुंबई : हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणार असून, महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेता कोण असणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच आलेला नाही. अर्ज आल्यानंतर याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीत सर्वाधिक २० आमदारांचे संख्याबळ शिवसेनेकडे (ठाकरे) असल्याने विरोधी पक्षनेता हा आपल्याच पक्षाचा असावा, असे मत ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आले आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे १६ तर राष्ट्रवादीकडे १० आमदार आहेत. या तिन्ही पक्षांकडे एकूण सदस्य संख्येच्या १० टक्केही आमदार नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाबाबत काय निर्णय घ्यायचा, हे सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांवरच अवलंबून आहे.
हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
अधिवेशनात निर्णय घेणार : वडेट्टीवार
● विरोधी पक्षनेत्याबाबत महाविकास आघाडीचा कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत बोलताना माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनात आमची एकत्र बैठक होणार आहे. त्यावेळी चर्चा करून विरोधी पक्षनेते पदासाठी नाव देऊ, परंतु विरोधी पक्षनेतेपद देण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची इच्छा असेल तरच नाव देऊ. आम्ही नाव द्यायचे आणि त्यांनी तोंडघशी पाडायचे, यापेक्षा त्यांनाच विचारून नाव देणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा : BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
● विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडे नाही. राज्य सरकारला विरोधी पक्षनेता हवा असल्यास नाव सुचवण्यात येईल अन्यथा नाही, असेही वडेट्टीवार यांनी येथे स्पष्ट केले. तर उद्धव ठाकरे हे अधिवेशनासाठी जाणार आहेत. ते नागपुरात मविआच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.