२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन पाच महिने पूर्ण झाले आहेत. शिंदे गटाचं बंड झाल्यानंतर हे बंड कसं झालं याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशात विजय शिवतारे यांनी हा गौप्यस्फोट केला आह
काय म्हटलं आहे विजय शिवतारे यांनी?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला होता असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची घोषणा झाली. मात्र निवडणूक कशी लढवायची हे आधीच ठरलं होतं. कोणत्या जागांवरचे उमेदवार पाडायचे, कुणाला विजयी करायचं हे सगळं ठरलं होतं. आता जे काही सुरू आहे ते फक्त लोकांना फसवणं सुरू आहे असंही विजय शिवतारेंनी उद्धव ठाकरेंबाबत मह्टलं आहे.
बहुमताचे आकडे कसे जुळवायचे हे निवडणुकीच्या आधीच ठरलं होतं
बहुमताचे आकडे कसे जुळवायचे हे निवडणुकीच्या आधीच ठरलं होतं असं विजय शिवतारेंनी सांगितलं. तसंच 70 जागांव शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे करून त्या जागा घालवण्यात आल्या. हे सगळं उद्धव ठाकरेंनी केलं. निवडणुकीच्या आधीच ही सगळी सेटलमेंट झाली होती. कुठल्या जागा पाडायच्या, कुठल्या जागा जिंकायच्या आकडेवारी कशी जुळवून आणायची हे सगळं कारस्थान होतं असंही विजय शिवतारेंनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी निकालानंतर झाली नाही ती त्याच्या आधी झाली होती. जे सरकार निर्माण झालं ते महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या मनात उठावाचं बीज मी पेरलं
मुंबईतील एका सभेत बोलताना, एकनाथ शिंदेंच्या मनात उठावाचे बीज मीच पेरलं, असा दावा विजय शिवतारे यांनी केला होता. “२०१९ मध्ये राज्यात जे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं, ते राज्याच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातच उचल खाल्ली होती. हा उठाव करायचं बीज एकनाथ शिंदेच्या डोक्यात विजय बापू शिवतारेंनी घातलं”, असे ते म्हणाले होते. तसेच “महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांनीच मी एकनाथ शिंदेंना घेऊन नंदनवन येथे बसलो होतो. मी तेव्हाच त्यांना सांगितलं की, राज्यात जे सुरू आहे, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जे चाललं आहे ते चुकीचं आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा की ही महाविकास आघाडी तोडली पाहिजे. राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार आले पाहिजे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.