मुंबई : चंद्रपूर येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी व्यवस्थापनाला हस्तांतरित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्राला महायुती सरकारएवढाच अदानींचाही धोका आहे. विमानतळ, वीज, धारावी आणि आता शाळेवर अदानींचा डोळा आहे. महायुती सरकार महाराष्ट्राचा सातबारा अदानीच्या नावे लिहिणार का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

हेही वाचा >>> महायुतीचा विरोधी पक्षनेता कोण हे फडणवीस यांनी ठरवावे’; बाळासाहेब थोरात यांना १८० जागा जिंकण्याचा विश्वास

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे शनिवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी शाळेच्या भिंतीवर लावलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांसोबत आता गौतम अदानी यांचे छायाचित्रही लावण्याची तयारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारकडून सुरू झाल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

देशाला शिक्षणाचा मार्ग देणाऱ्या महाराष्ट्रावर आज अदानी समूहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ आली आहे. जमीन, उद्याोगांबरोबरच सरकार आता शाळाही अदानींच्या ताब्यात देत आहे. महाराष्ट्र विक्रीला काढल्याचे हे उत्तम उदाहरण आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे.