नागपूर : महाविकास आघाडीकडून निवडून येण्याची शक्यता असणाऱ्यानांच उमेदवारी दिली जाईल. आघाडीत मोठा भाऊ आणि लहान भाऊ हा मुद्दाच नाही. काँग्रेसच जास्त जागा लढणार आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. आघाडीने केलेल्या सर्वेक्षणानुसार आताची परिस्थिती पाहून जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल. मागील दोन निवडणुकांमध्ये कोण पराभूत झाले, कोणी काम केले नाही याचा विचार न करता आघाडीतील तीनही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा : Haryana Exit Poll: सत्ता टप्प्यात दिसताच काँग्रेससमोर मुख्यमंत्री पदाचा पेच; पद एक, दावेदार अनेक

राहुल गांधी यांच्या पदयात्रेने देशातील विषमता दूर करण्याचे काम केले आहे. मात्र, भाजपकडून जातीजातीत विष कालवण्याचे काम सुरू असून त्याला आता जनता कंटाळली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या ‘४०० पार’ या घोषणेला जनतेने मतपेटीतून उत्तर दिले. आता दोन पक्षाच्या कुबड्या घेऊन सरकार चालवले जात आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.