Vijayashanti : काँग्रेसने तेलंगणा विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. ज्यातलं एक नाव सुप्रसिद्ध अभिनेत्री विजयाशांती यांचं आहे. विजयाशांती यांना लेडी अमिताभ असं म्हटलं जायचं. त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये कमबॅक केलं आहे.

२० मार्च रोजी तेलंगणा विधान परिषदेची निवडणूक

२० मार्च रोजी तेलंगणा विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी यासंबंधी एक घोषणा केली आहे. तेलंगणा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी तीन नावं जाहीर केली आहेत ज्यातलं एक नाव सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री विजयाशांती यांचं आहे. तसंच अद्दांकी दयाकर आणि केथवथ शंकर नाईक यांनाही काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसकडून एकूण तीन नावं जाहीर

तेलंगणा विधान परिषदेच्या पाच जागांसाठी २० मार्चला निवडणूक पार पडणार आहे. कारण भारतीय राष्ट्र समितीचे चार आमदार आणि एमआयएमचा एक आमदार असे पाच आमदार निवृत्त होत आहेत. काँग्रेसमध्ये कमबॅक करणाऱ्या विजयाशांती या आधी त्यावेळच्या बीआरएस आणि आत्ताच्या टीआरएसच्या लोकसभा खासदार होत्या. विजयाशांती यांनी तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी पक्षही स्थापन केला होता. त्यानंतर बीआरएस, भाजपा आणि काँग्रेसमध्ये गेल्या. काही काळ राजकारणापासून लांब राहिलेल्या विजयाशांती यांनी काँग्रेसमध्ये कमबॅक केलं आहे.

विजयाशांती या काँग्रेसच्या मागासवर्गीय उमेदवार म्हणून या निवडणुकीत पुन्हा येत आहेत.

विजयाशांती यांनी २०१४ मध्ये टीआरएसचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळत नाही म्हणत त्यांनी पक्ष सोडला. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला झटका लागल्याचीही चर्चा झाली. १९९६ मध्ये विजयाशांती यांनी अखिल भारतीय अन्ना द्रविड मुनेत्र काळघम या पक्षाला पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी जयललिता यांचा प्रचारही केला होता. ‘तल्ली तेलंगणा’ या नावाने त्यांनी पक्ष स्थापन केला होता. मात्र या पक्षाला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तो पक्ष टीआरएसमध्ये विलीन केला होता.

मोदींना म्हणाल्या होत्या दहशतवादी

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्या पुन्हा काँग्रेससह होत्या. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या अध्यक्षतेत आयोजित केलेल्या बैठकीत मोदींची तुलना दहशतवाद्याशी केली होती. मोदी हे दहशतवाद्यासारखे दिसतात. मोदींच्या कार्यकाळात हुकूमशाही वाढली आहे आणि लोकशाहीची हत्या करण्यात आली. आता लोक त्यांना संधी देणार नाहीत असं २०१९ मध्ये विजयाशांती म्हणाल्या होत्या. त्यामुळे बराच वादही निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन २०२० मध्ये भाजपात प्रवेश केला. मात्र २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता लेडी अमिताभ अशी ओळख असलेल्या विजयाशांती तेलंगणातल्या काँग्रेसच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार आहेत.

विजयाशांती यांची सिनेकारकीर्दही प्रदीर्घ

१९९० च्या दशकात त्या फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होत्या. त्याकाळात एका सिनेमासाठी त्या एक कोटी रुपये मानधन घ्यायच्या. १९९० मध्ये ‘कर्तव्यम’ या तेलुगू सिनेमात त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची जबरदस्त भूमिका केली. या भूमिकेसाठी त्यांनी पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. हा चित्रपट नंतर हिंदीतही डब करण्यात आला होता. त्यानंतर विजयाशांती यांना ‘लेडी अमिताभ’ म्हणून ओळखले जाऊ लागलं. तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तिन्ही भाषेतील अनेक सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केलं.