संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपमधील जुन्याजाणत्या नेत्यांना नवी दिल्लीतील शिर्षस्थ नेत्यांची भेट मिळणे अशक्यप्रायच. पण काँग्रेसमधून भाजपवासी झालेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी वा गृहमंत्री अमित शहा यांची वरचेवर भेट मिळत असल्यानेच राज्यातील भाजप नेतेही अचंबित झाले आहेत. महसूलमंत्री विखे-पाटील व त्यांचे खासदार पूत्र सूजय विखे-पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. काही महिन्यांपूर्वीच विखे-पाटील यांनी कुटुंबासह मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हा विखे-पाटील यांच्या नातीचे मोदींबरोबरील छायाचित्र पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले होते.

हेही वाचा… रुपेश राऊळ : राडा संस्कृतीतील लढवय्या

राज्यातील भाजप नेत्यांना मोदी यांची भेट मिळणे फारच कठीण मानले जाते. या तुलनेत विखे-पाटील यांना भाजपच्या सर्व शिर्षस्थ नेत्यांची भेट मिळत असल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ राज्य भाजपच्या राजकारणात काढले जातात. राज्यात सत्तांतर झाल्यावर मंत्रिमंडळात विखे-पाटील यांचा समावेश होणार हे निश्चित होते. पण त्यांच्याकडे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनंतर महत्त्वाचे मानले जाणारे महसूल खाते सोपविण्यात आले तेव्हाच भाजपमध्ये कुजबूज सुरू झाली. कारण महसूल खात्यावर चंद्रकांत पाटील यांचा डोळा होता. फडण‌वीस सरकारमध्ये चंद्रकांतदादांनी महसूल खाते भूषविले होते. पण बदलत्या समीकरणात विखे-पाटील यांना महत्त्व देण्यात आले.

हेही वाचा… ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय राजकीय नेते सावध भूमिकेत

शैक्षणिक संकूल, शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण आणि निळवंडे धरणाच्या उद्धघाटनासाठी मोदी यांना निमंत्रण देण्याकरिता भेट घेतल्याचे खासदार सूजय विखे-पाटील यांनी म्हटले आहे. राज्य भाजपमध्ये मराठा समाजातील नवे नेतृत्व पुढे आणण्याचे शिर्षस्थ नेत्यांचा प्रयत्न असावा. विनोद तावडे आता राष्ट्रीय राजकारणात स्थिरस्थावर होत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. आशिष शेलार यांना दिल्लीतील नेत्यांचा आशिर्वाद आहे. याबरोबरच साखर पट्ट्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि नगरसारख्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रभाव क्षेत्रात विखे-पाटील यांचे नेतृत्व पक्षाला उपयुक्त वाटत असावे. मोदी व शहा हे भेट देतात याचाच अर्थ विखे-पाटील यांच्याबद्दल या दोन्ही नेत्यांच्या मनात काही तरी वेगळा विचार असावा, अशी पक्षातच प्रतिक्रिया आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikhe patil meets pm narendra modi amit shah j p nadda print politics news asj