भाजपने बिहारमध्ये जनता दलाचे (संयुक्त) नितीशकुमार यांच्याबरोबर मैत्रीचा हात पुढे करून सत्ता मिळविली आणि विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील महत्वाचा मोहरा आपल्याकडे खेचून घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आघाडीचा विश्वास खच्ची करण्यात भाजपला यश मिळाले आहे. नितीशकुमार यांचे नाव ‘इंडिया’ आघाडीचे निमंत्रक किंवा विरोधकांचा पंतप्रधानपदासाठीचा चेहरा यासाठी चर्चेत होते. पण भाजपने चक्रे फिरविली आणि नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेऊन पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ देण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये झालेल्या या राजकीय स्थित्यंतरामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेते विनोद तावडे यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यासाठी गेले एक-दीड वर्ष त्यांनी नियोजनपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्यानंतर भाजपला विरोधकांच्या आघाडीला मोठे खिंडार पाडण्यात यश मिळाले आहे. तावडे यांच्यावर काही काळापूर्वी अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि ईशान्येतील राजकीय घडामोडींमध्ये पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – तमिळनाडूत लोकसभेसाठी जागावाटपाचे सूत्र ठरले? डीएमके काँग्रेसला नऊ जागा देण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तावडे हे शालेय व उच्च शिक्षण, सांस्कृतिक यासह काही खात्यांचे मंत्री होते. भाजप सरकार येण्याआधी ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेही होते. मुख्यमंत्रीपदासाठीही त्यांचे नाव अधूनमधून चर्चेत असते. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे तावडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पण त्यातून खचून न जाता तावडे हे परिस्थितीला शांतपणे व खंबीरपणे सामोरे गेले. अपली नाराजी कधीही उघड न करता पक्षावर विश्वास ठेवून राहिले. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विश्वास टाकून राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविली. महाराष्ट्रातील राजकारण आणि पक्षाअंतर्गत कुरघोड्यांमध्ये न गुंतता तावडे यांनी राष्ट्रीय राजकारणातील संधी हेरली. ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, नितीन गडकरी या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपल्या कामगिरीची मोहोर उठविली आहे. गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही झाले आणि सध्या केंद्रीय मंत्री आहेत. तावडे हेही खंबीरपणे राष्ट्रीय राजकारणात पावले टाकत या नेत्यांच्या पंक्तीत जाण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा – ‘भारत जोडो न्याय यात्रा’ बिहारमध्ये; काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन, राहुल गांधी नितीश कुमारांवर बोलणार?

तावडे यांच्यावर भाजपने विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी बिहारच्या आणि पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या प्रभारीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भाजपने आतापर्यंत कधीही न जिंकलेल्या किंवा कमी फरकाने हरलेल्या १४० लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मेहनत घेतल्यास यापैकी काही जागांवर यश मिळेल, असे भाजपला वाटत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, मुद्दे व अन्य बाबींवर भाजप काटेकोर लक्ष ठेवून आहे. निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्य पक्षातील नेते येत आहेत व येणार आहेत. पण पक्षाची ध्येय धोरणे व राजकीय सोय आदी बाबी विचारात घेऊन त्यांच्यापैकी कोणाला प्रवेश द्यायचा किंवा नाही, याचा निर्णय घेण्यासाठी भाजपने वरिष्ठ नेत्यांची समिती नियुक्त केली असून त्यात तावडे यांचा समावेश आहे. पक्षातील विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या तावडे यांना भाजपकडून पुढील काही काळात आणखी मोठी संधी व जबाबदारी मिळण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod tawde strong move towards opportunities in national politics print politics news ssb