सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील यांना एक लाखावर मतांनी पराभूत करून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय संपादन केला. या निवडणुकीत झालेले मतदान पालकमंत्री सुरेश खाडे आणि भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना धोक्याचा इशारा देणारे आहे. दोन-चार महिन्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार असून निवडणूक निकालात मिळालेल्या मतामुळे काँग्रेसला आशादायी चित्र दिसत आहे.

सांगली मतदार संघामध्ये सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव आणि जत हे सहा विधानसभा मतदार संघ आहेत. यापैकी सांगली व मिरज मतदार संघाचे सध्या प्रतिनिधीत्व भाजपकडे आहे, तर तासगाव-कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे आहे. आणि जत व पलूस-कडेगावचे नेतृत्व काँग्रेसकडे आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जत वगळता अन्य सर्व मतदार संघात अपक्षाने बाजी मारत मताधिक्य घेतले. अपक्ष असलेल्या विशाल पाटील यांनी अगोदरपासूनच हे आपले वैयक्तिक बंड नसून काँग्रेसचे बंड असल्याचे जाहीर केले होते. याचाच अर्थ सांगलीची झालेली लढत ही भाजप विरूध्द काँग्रेस अशीच झाली. यामुळे काँग्रेसला सध्या अच्छे दिन आल्याचे लोकसभा निवडणूक निदर्शकच मानली जात आहे.

हेही वाचा…नाशिक शिक्षकमध्ये सर्व प्रमुख उमेदवार धनाढ्य अन शिक्षण संस्थाचालक

विधानसभेमध्ये सांगलीचे प्रतिनिधीत्व सध्या भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्याकडे आहे. गेल्या वेळी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा निसटता पराभव झाला असून यावेळी काँग्रेसकडून मैदानात येणारा उमेदवार हा अधिक ताकदीने असणार. आमदार गाडगीळ हे तिसर्‍यांदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामुळे त्यांना आता ही निवडणूक वाटते तेवढी सोपी असणार नाही. कारण सातत्याने पुन:पुन्हा तोच चेहरा लोकासमोर गेला तर काय होऊ शकते याची प्रचिती या लोकसभा निवडणुकीत आली आहे. तीच गत मिरजेचीही आहे. मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांनाही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगलीत भाजपला झालेले मतदान १९ हजार १९२ मतांनी कमी आहे, तर मिरजेत २५ हजार ८१ मतांनी कमी आहे. विधानसभा निवडणुकीत हे मतदान भरून काढून विजयी होण्यासाठी वाढीव मतदान घ्यावे लागणार आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ हा मतदार संघ हा तसा भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा बालेकिल्ला असतानाही या मतदार संघामध्ये अपक्ष विशाल पाटील यांना ९ हजार ४११ मते अधिक मिळाली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने महाविकास आघाडीचा धर्म मोडीत काढत बंडखोरीला पाठबळ दिले. अगदी शरद पवार यांची तासगावमध्ये आघाडीच्या चंद्रहार पाटील यांच्यासाठी जाहीर सभा होऊनही या ठिकाणी अपक्षाला मिळालेली साथ भाजपच्या पराभवाला जशी कारणीभूत ठरली तशीच आतापर्यंतचा खासदारही आमचा आणि आमदारही आमचाच ही पडद्याआडची खेळी मोडीत निघाली.

हेही वाचा…शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या महायुतीच्या नेत्यांच्याच हालचाली, लोकसभा निवडणुकीचा बोध

काँग्रेसचे नेतृत्व या निवडणुकीमुळे आपसूकच माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांच्याकडे आले आहे. त्यांनी आपल्या मतदार संघामध्ये सर्वाधिक म्हणजे ३६ हजार १८२ मताधिक्य अपक्षाला दिले आहे. यामुळे हा मतदार संघ सध्या तरी काँग्रेसला सुरक्षित वाटत असला तरी जतचे काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत हे अडचणीत आल्याचे दिसत आहे. भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप अपक्षासाठी काँग्रेससोबत असतानाही भाजपला या मतदार संघात अपक्षापेक्षा ६ हजार २९८ मते अधिक आहेत. पाण्याच्या प्रश्‍नावर हे मताधिक्य भाजपला मिळाले आहे. यामुळे जतमध्ये भाजपला चांगली संधी असल्याचे या निवडणूक निकालावरून दिसून येत असले तरी सांगली, मिरज हे दोन मतदार संघ भाजपच्यादृष्टीने अडचणीचे भासत आहेत. खानापूर-आटपाडी हा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व शिवसेनेचे स्व.अनिल बाबर यांच्याकडे होता. त्यांच्या अकाली निधनानंतर सुहास बाबर हेच राजकीय वारसदार सध्या तरी दिसत आहेत. मात्र, महायुतीतील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी कोणत्याही स्थितीत विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा दोन दिवसापूर्वी केली आहे. बाबर गटाने यावेळी नेते भाजपच्या प्रचारात आणि कार्यकर्ते अपक्षाच्या दिमतीला अशी भूमिका घेतली होती. यामुळे अपक्षाला भरघोस मते मिळाली. यामुळे विधानसभेला आता गणिते कशी असतील हे पाहणेही मनोरंजक ठरणार आहे.