जळगाव : शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांचे निलंबन करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत ठाकरे गटाकडून नवीन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती झालेली नाही. नावाच्या निश्चितीसाठी फक्त खलबते सुरू आहेत. दुसरीकडे, शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दोन महिन्यांपूर्वी पक्षात ठाकरे गटातून दाखल झालेले जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांना जिल्हाप्रमुखपदाची संधी देत ठाकरे गटाला चांगलीच चपराक दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचारात सक्रिय न झाल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाने तत्कालिन जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांचे तडकाफडकी निलंबन केले होते. निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली असताना, ठाकरे गटाकडून अचानक निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर भंगाळे यांनी सावध पवित्रा घेत शिंदे गटात प्रवेश केला होता. माजी महापौर असलेल्या भंगाळे यांच्या प्रवेशामुळे महायुतीच्या जळगाव शहर आणि ग्रामीणमधील दोन्ही उमेदवारांना बऱ्यापैकी फायदा झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पक्ष संघटन बळकट करण्यासाठी शिंदे गटाने विष्णू भंगाळे यांची आता थेट जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
हेही वाचा…भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
दुसरीकडे, महापालिका-नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका लक्षात घेत ठाकरे गटाकडूनही संघटनात्मक बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, पक्षाला संघर्षाच्या काळात साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाप्रमुखसारख्या जबाबदारीच्या पदावर नव्याने नियुक्ती करताना विचारणा झालेली नाही. तळागाळातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चालणाऱ्या तसेच कोणाच्या दबावापुढे न झुकणाऱ्या पदाधिकाऱ्याची त्या पदावर नियुक्ती होणे अपेक्षित असताना, पक्षश्रेष्ठींनी त्यापदावर संपर्क प्रमुखांच्या जवळच्या व्यक्तीची वर्णी लावण्याचे निश्चित केल्याचे बोलले जात आहे. त्याबद्दल जाहीर नाराजी माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना विचारात न घेतल्यास पक्षात मोठी फूट त्यामुळे पडू शकते, असाही इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून जळगावमधील जिल्हाप्रमुखपदाच्या निवडीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, त्या पदावरून निर्माण झालेला वाद लक्षात घेता ठाकरे गटाला त्यावर तोडगा काढून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मताचा आदर राखावा लागणार आहे.