विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान देशव्यापी ‘शौर्य जागरण यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू धार्मिक समाजाची चेतना जागृत करणे आणि लव्ह जिहाद, धर्मांतर रोखणे आणि सनातन धर्माबाबत जनजागृती करण्याचे काम या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. यासोबतच विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) वतीने ‘धर्म योद्धे’ तयार करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. हे योद्धे धर्म विरोधी कृतींवर लक्ष ठेवण्याचे काम करतील. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात अशाप्रकारची यात्रा घेण्यात येत आहे. विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, या यात्रेच्या माध्यमातून लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे धोके आम्ही लोकांच्या लक्षात आणून देणार आहोत.
बन्सल पुढे म्हणाले की, यात्रेतून धर्मजागृती करण्यासोबतच आम्ही धर्म योद्ध्यांचे गट स्थापन करणार आहोत, जे धर्मविरोधी कृतींवर लक्ष ठेवून असतील आणि धर्मांतर रोखणे तसेच घरवापसी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ते पुढाकर घेतील. याबाबत एक सर्वसमावेशक योजना आखण्यात आली असून ती संपूर्ण देशभरात राबवली जाईल. मुस्लीम पुरुषाने हिंदू महिलेशी लग्न करण्याच्या कृतीला हिंदुत्ववादी संघटना लव्ह जिहाद असे म्हणतात, तर इतर धर्मातील लोक त्यांचा धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारत असतील तर त्याला घर वापसी असे म्हटले जात आहे.
हे वाचा >> ‘सनातन’ वाद; ‘द्रमुक’ पक्षाचा इतिहास काय? पेरियार यांनीही केली होती हिंदू धर्मावर टीका
२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे देशभरात काढण्यात येणाऱ्या ‘शौर्य जागरण यात्रे’ला महत्त्व प्राप्त झाले आहे. यात्रेमुळे भाजपाच्या बाजूने वातावरण निर्मिती होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बन्सल म्हणाले की, यात्रेच्या दरम्यान लोकांना सनातन धर्माचे महत्त्व समजावून सांगण्यात येईल. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर टीका केली होती. त्यावरून विहिंपने सनातन धर्माबाबत आणखी जागृती निर्माण करण्याचा उपक्रम यात्रेच्या निमित्ताने हाती घेतला आहे.
बन्सल म्हणाले की, हिंदू धर्माचा विरोध करणाऱ्या दुष्ट योजनांची माहिती हिंदू समाजाला देण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. अशा दुष्ट शक्तींशी लढण्यासाठी समाजाला तयार करणे आणि इतर धर्मातील लोकांना हिंदू धर्मात पुन्हा आणण्याचा उद्देश यात्रेसमोर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या राज्यात निवडणुकांची घोषणा होऊ शकते, अशा राज्यात ही यात्रा लगेचच सुरू करण्यात येणार आहे. अयोध्येत भगवान रामाचा पुतळा उभा राहण्याआधी देशभरातील प्रत्येक घरातून पाच मातीचे दिवे गोळा करण्याचे नियोजन विश्व हिंदू परिषदेने केले असल्याचेही बन्सल यांनी सांगितले.
‘शौर्य जागरण यात्रे’दरम्यान साधू-संतांची पदयात्रा आयोजित केली जाणार आहे. तसेच घरा-घरात जाऊन आणि मंदिरांबाहेर धार्मिक प्रवचन दिले जाणार आहे. लोकांनी आपल्या श्रद्धांवर विश्वास ठेवून त्याच्या बाजूने कसे उभे राहावे आणि धर्मविरोधी घटकांचा डाव कसा ओळखावा; याबाबत जनजागृती केली जाईल, असेही बन्सल म्हणाले.
आणखी वाचा >> खलिस्तानसमर्थकांवरील कारवाईनंतर विश्व हिंदू परिषदेने आम आदमी पक्ष, केंद्र सरकारचे केले कौतुक
अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होत असताना त्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रीन लावून ठिकठिकाणी दाखविण्याचे नियोजनही विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. उद्घाटनाप्रसंगी अनेक ठिकाणी पूजाअर्चा करणे, धार्मिक विधी करणे आणि अयोध्येतील कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील लोकांना गोळा करण्याचेही नियोजन विहिंपच्या वतीने करण्यात येत आहे. विहिंपच्या एका नेत्याने सांगितले की, ६२ कोटी लोकांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी देणगी दिली आहे, या सर्व लोकांनी उद्घाटनाचा कार्यक्रम पाहावा, असा आमचा मानस आहे.
राम जन्मभूमीच्या आंदोलनात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला किंवा राम मंदिराच्या निर्माणात योगदान दिले, त्यांचाही सत्कार करण्याचे नियोजन आखले जात आहे. ज्या लोकांनी मंदिराच्या बांधकामासाठी बलिदान दिले, त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाईल, असेही बन्सल यावेळी म्हणाले.