लातूर: लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून दावेदार असणारे विश्वजीत अनिल गायकवाड यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो आपण उमेदवार असू असे सांगितले आहे. विश्वजीत गायकवाड हे राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अनिल गायकवाड यांचे चिरंजीव आहेत.

लातूर लोकसभा मतदारसंघासाठी अनिल गायकवाड यांचे नाव प्रारंभी चर्चेत होते. मात्र, त्यांची नियुक्ती राज्य रस्ते विकास महामंडळात झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी आपली दावेदारी पक्षाकडे केली होती. उदगीर येथे घेतलेल्या मेळाव्यात विश्वजीत गायकवाड यांनी आपण उमेदवार असूच असे जाहीर केले.

हेही वाचा >>>मंत्रालयात विधानसभा उपाध्यक्षांसह आमदारांच्या जाळ्यांवर उड्या मुख्यमंत्री भेट देत नसल्याने टोकाचे पाऊल

गेल्या दोन महिन्यापासून विश्वजीत गायकवाड हे उदगीर येथेच मुक्कामी आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघात त्यांचा रोज दौरा असतो. भाजपाकडून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही त्यानंतर त्यांनी उदगीर विधानसभेवर आपले लक्ष केंद्रित केले. उदगीर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) गटाकडे आहे .राज्याचे क्रीडा मत्री संजय बनसोडे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे हा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा आहे. अजितदादा गटाची युती फिसकटली तर आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा बाळगून विश्वजीत गायकवाड मतदार संघात फिरत होते. मात्र त्यांनी पक्षांनी उमेदवारी देवो अथवा न देवो आपण या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहू असे जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या बॅनर वर त्यांचे काका व माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांचे छायाचित्र वापरले आहे. भाजपचे उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव व २०१९ चे भाजपचे उमेदवार डॉक्टर अनिल कांबळे या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार गटातून उमेदवारी साठी अगोदरच दावेदार असल्यामुळे अपक्ष म्हणून गायकवाड यांनी निवडणूक लढवण्याचे नक्की केल्याचा दावा त्याचे समर्थक करतात.

भाजपातील एक गट विश्वजीत गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची चर्चा आहे .उदगीर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला एकेकाळी होता या मतदारसंघातून दोन वेळा सुधाकर भालेराव निवडून आले होते.