सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत काँंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष मैदानात उतरून विजय संपादन केला एवढाच या निकालाचा अर्थ नसून जिल्ह्याचे किंबहुना पश्‍चिम महाराष्ट्रातील नेतृत्व कोणाचे याचा फेसला करणारी निवडणूक ठरली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्यातील राजकीय नेतृत्वाची लढाई होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण आमदार पाटील यांनी उमेदवारी वाटपावेळी धारण केलेले मौन आणि काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आमदार कदम यांनी दिल्लीपर्यंत केलेली पायपीट पाहता जिल्ह्यातील नेतृत्व स्पर्धा या पुढील काळात अधिक तीव्रपणे पुढे येण्याची चिन्हे आहेत. याची झलक तोंडावर आलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पाहण्यास मिळाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

हेही वाचा – मुंबईत मराठी टक्का दोन्ही शिवसेनेचा

महाविकास आघाडी राज्य पातळीवर महायुतीच्या विरोधात जोरदारपणे प्रयत्नशील असताना सांगलीच्या जागा एवढ्या सहजासहजी ठाकरे शिवसेनेला दिली गेलीच कशी असा प्रश्‍न सामान्यांना पडला आहे. कोल्हापूरच्या बदली सांगली ही सबब न पटणारी आहे. कारण ठाकरे शिवसेनेची ताकदच मुळात तोळामासा, गावपातळीवरील एकाही ग्रामपंचायतीचे सदस्यत्व न मिळालेली शिवसेना थेट लोकसभेच्या जागेसाठी एवढी आग्रही का राहिली? राहिली ती राहिली निष्ठावान शिवसैनिकाला उमेदवारी न देता भाजप, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी या पक्षाची दारे पुजल्यानंतर सेनेचे शिवबंधन हाती बांधल्यानंतर दहा दिवसांत उमेदवारी मिळते हे कसे शक्य आहे. एवढा राजकीय पोक्तपणा कुणाकडे नसावा ही न पटणारी बाब म्हणावी लागेल.

काँग्रेसचा सांगली बालेकिल्ला, त्यात राज्याचे एकेकाळी नेतृत्व केलेल्या विशाल पाटील यांना घेऊन डॉ. कदम यांनी गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेची तयारीही केलेली. परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने मतदारसंघही ढवळून काढलेला. असे असताना अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली शिवसेनेला आंदण देण्यासाठी कुणाचा दबाव होता हा प्रश्‍न सातत्याने विचारला जात होता. विशाल पाटील यांच्या उमदेवारीसाठी झारीतील शुक्राचार्य कोण असा सवालही उपस्थित झाला. यातून या राजकीय खेळीमागे जिल्ह्यातील जुना बापू-दादा वाद असल्याच्या समजाला खतपाणी मिळत गेले. आमदार पाटील यांच्याकडे संशयाची सुई गेली. त्यांनी किमान पाच वेळा यामध्ये माझा कोणताच सहभाग नसल्याचे सांगत हा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील प्रश्‍न असल्याचे सांगत स्वत:ला या वादातून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉ. कदम यांनी संयम न ढळता राजकीय स्थिती हाताळत खर्‍या अर्थाने काँग्रेस नेतृत्वाची भूमिका बजावाली. स्व. पतंगराव कदम यांचे नेतृत्व आश्‍वासक होते. त्याच नेतृत्वाचा वारसा त्यांच्याकडे असला तरी यापेक्षा वैयक्तिक म्हणून वेगळा गुण यामुळे दिसून आला. या निमित्ताने काँग्रेस एकसंघ झाल्याचे दिसून आले. एकसंघ काँग्रेसच्या विमानाचे पायलट असल्याचे आमदार कदम यांनी या निमित्ताने दाखवून दिले.

हेही वाचा – पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा

या उलट आमदार जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचा प्रचार करूनही आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना एकूण मतदानापैकी पाच टक्के मिळवताना नाकी नऊ आले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन सभा, संजय राऊत यांचे तीन दौरे होऊनही सांगलीत आघाडीच्या उमेदवाराला साठ हजार मते मिळाली. यावरून आमदार पाटील यांचेही मतदारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांनी ऐकले नाही हे स्पष्ट आहे. अपक्ष निवडून आल्यानंतर विशाल पाटील यांच्या आनंदोत्सवात काँग्रेसचे निशाण झळकले. खासदार राऊत यांनी मागणी करूनही काँग्रेसने कारवाई टाळली. यामागे सूत्रबद्ध नियोजन आणि पक्षाचा छुपा पाठिंबा होता हे आता लपून राहिलेले नाही. यामुळे ही काँग्रेसची संघटित ताकद येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली, मिरज, जत आणि पलूस-कडेगाव मतदारसंघात आश्‍वासक ठरणार आहे. आणि ही संघटित ताकद भाजपला धोक्याचा इशारा देणारी ठरणार आहे.