सांगली : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करून आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला मेळावा अपेक्षेप्रमाणे भव्य दिव्य झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत याचे मतात परिवर्तन होण्यासाठी ही ताकद उपयुक्त ठरणार आहे का? कारण पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या देशमुख गटानेही यावेळी परिवर्तनासाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीवेळची राजकीय स्थिती आणि विधानसभेवेळची राजकीय परिस्थिती यामध्ये फरक असणार आहे.
स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि स्मृती स्थळाचे लोकार्पण सोनहिरा कारखान्यावर करण्यासाठी या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याची भव्यता पाहता खर्च सढळ हाताने झाला असल्याची प्रचिती येते. मेळाव्यासाठी दोन लाख लोकांची बैठक व्यवस्था २० एकरावर उभारण्यात आलेल्या मंडपात करण्यात आली होती. वाहनांची कोंडी कडेगावने पहिल्यांदाच अनुभवली. येणार्यांची सगळीच व्यवस्था गावाला जोडणार्या रस्त्यावर करण्यात आली होती. नियोजनात गोंधळ होणार नाही याची जातीने खबरदारी घेण्यात आली. दिमतीला भारती विद्यापीठातील लोक होतेच. आणि डॉ. पतंगराव कदम यांनी मतदार संघासाठी उपलब्ध केलेल्या रोजगाराच्या संधीमुळे साहेबांच्या स्मृतीसाठी होत असलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहणे हे कर्तव्य मानल्यामुळे राजकीय कार्यक्रम असूनही भावनिक करण्यात यश आले असेच म्हणावे लागेल.
आमदार डॉ. कदम यांच्यासाठी हा मेळावा म्हणजे विधानसभेसाठीची पूर्व तयारी म्हटला पाहिजे. प्रास्ताविकमध्ये त्यांनी लोकांच्यासाठी सदैव कार्यरत राहू अशी घेतलेली शपथ म्हणजे साहेबांवर प्रेम करणार्यांना भावनिक साद होती. आता या सादेला सकारात्मक प्रतिसाद मिळतो की, आव्हानात्मक हे निवडणुकीच्या रणमैदानातच दिसेल.
कदम साहेबांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोट निवडणुकीमध्ये भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र सहानभूतीमध्ये हा डाव यशस्वी होणार नाही हे लक्षात आल्यानंतर अखेरच्या क्षणी भाजपने माघार घेतली. यामुळे पहिली सार्वत्रिक निवडणुक सोपी गेली. यानंतर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत देशमुख पुन्हा मैदानात येण्याच्या तयारीत असताना पलूस-कडेगावची जागा शिवसेनेला मिळाली. यामुळे देशमुखांना माघार घ्यावी लागली. यावेळी शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख संजय विभुते यांची उमेदवारी होती. कसलेला मल्ल आणि जत्रा आल्यावर मैदानात उतरणारा मल्ल अशा लढतीत डॉ. कदम यांनी ८३.०४ टक्के म्हणजे १ लाख ७१ हजार ४९७ इतकी विक्रमी मतदान घेतले होते. मात्र या निवडणुकीत शिवसेनेच्या विभुते यांना ८९७६ तर नोटाला २० हजार ६३१ मते मिळाली होती.
आणखी वाचा-सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार कदम यांनी अपक्ष विशाल पाटील यांची बाजू घेतली होती. तसेच भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करणारे भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही अप्रत्यक्ष विशाल पाटील यांनाच मदत केली. यावरून भाजपमध्ये तक्रारही झाल्या होत्या. तरी भाजप उमेदवाराला या निवडणुकीत ५९ हजार ३७६ मते मिळाली. विधानसभेचे संभाव्य उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी प्रामाणिकपणे भाजपला मदत केली होती. तर शिवसेनेचे पैलवान पाटील यांना १३ हजार ६५९ मते मिळाली. म्हणजे खसदार. विशाल पाटील यांच्या विरोधात मतांची बेरीज ७३ हजारावर होती. आणि विशाल पाटलांना मिळालेली मते ९५ हजार ५६८ होती. तीनही उमेदवार मतदार संघाबाहेरचे होते. आता तर गावच्या मैदानात घरच्या पैलवानांमध्ये लढत होणार आहे. यामुळे विधानसभेची निवडणुक मागील निवडणुकीप्रमाणे सोपी असेलच असे नाही. याशिवाय पदवीधर मतदार संघावेळी कुंडलच्या आमदार अरूणअण्णा लाड यांना मदत केली असली तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यावेळी जमले नाही तर पुढच्या वेळी मैदानात उतरण्याच्या तयारीत क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड प्रयत्नशील आहेत. यामुळे या गटाच्या ताकदीचाही परिणाम या निवडणुकीत होणार आहे.