मुंबई : देशात सर्वांत कमी मतदान करणारा मतदारसंघ म्हणून कुलाबा मतदारसंघाची नाचक्की होत आहे. कुलाब्यावरील हा डाग पुसण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘व्होट करेगा कुलाबा’, अशी मोहीम माय ड्रीम कुलाबा, कुलाबा अडव्हान्स्ड लोकॅलिटी मॅनेजमेंट (सीएएलएम) सारख्या विविध सामाजिक संघटना, निवृत्त अधिकारी आणि व्यावसायिकांनी समाज माध्यमांवर चालविली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ४३.६८ टक्के मतदान झाले होते. सातत्याने कुलाब्यात मतटक्का कमी राहिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत कुलाब्यातील कमी मतदानाबद्दल चिंता व्यक्त केली. गडचिरोली आणि बस्तर या नक्षलबहुल भागांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होते, पण कुलाब्यात सरासरी ४० टक्के मतदान होते. टक्केवारी वाढविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्याचे आव्हान
कुलाब्यात राहणारे शहरी, उच्चभ्रू आणि अतिश्रीमंत मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर येत नाहीत. अति श्रीमंत, उच्चभ्रू भागांत मत टक्का २५ टक्क्यांहूनही कमी आहे. कुलाब्यातील झोपडपट्टी भागात मतदानाची टक्केवारी जास्त असते, त्यामुळे एकूण मतदान ४० टक्क्यांच्या आसपास होते. त्यासाठी प्रामुख्याने माय ड्रीम कुलाबा, कुलाबा अडव्हान्स्ड लोकॅलिटी मॅनेजमेंट (सीएएलएम) सारख्या सेवाभावी संस्था, निवृत्त नौदल अधिकारी, मारिया कोरेरा, सिंथिया डिमिलो यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते मोहीम राबवीत आहेत.
मतदारांचे प्रबोधन
मोहिमेतील सक्रिय कार्यकर्ते सुधीर मोदी म्हणाले, ‘व्होट करेगा कुलाबा’ ही मोहीम मत टक्का वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, नौदलातील निवृत्त अधिकारी, विविध व्यावसायिक संघटनांच्या मदतीने राबविण्यात येत आहे. यासाठी काही स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. ते प्रत्येक रहिवासी संकुलात जातात. मतदारांचे प्रबोधन करतात. मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहनासह अन्य कोणत्या प्रकारच्या सोयीची गरज आहे का, याची विचारणा करून तशी नोंद करण्यात येते. अनेक नामांकित हॉटेलनी मतदान केल्याची बोटावरील शाई किंवा खूण दाखवून सवलत देण्याची घोषणा केली आहे. अनेक धार्मिक स्थळांमधून प्रार्थनेनंतर मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.