नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पक्षांतराचा निर्णय त्यांच्या प्रभाव क्षेत्रासह काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांना खटकला असल्याचे समाजमाध्यमांतील प्रतिक्रियांतून समोर आल्यानंतर आता चव्हाण यांना केंद्रात मंत्री म्हणून पाहायचे असेल तर नांदेडमधील भाजपा उमेदवाराला विजयी करा तसेच आपले नेतृत्व जपा, अशी भावनिक साद भोकर विधानसभा क्षेत्रात घातली जात आहे.
नांदेड लोकसभा क्षेत्रातून पूर्वी शंकरराव चव्हाण यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती भूषविली. त्यानंतर जिल्ह्याच्या काही भागाचे प्रतिनिधित्व केलेल्या सूर्यकांता पाटील यांनाही केंद्रात राज्यमंत्री करण्यात आले होते. पण २००९ नंतर नांदेड किंवा हिंगोली लोकसभा क्षेत्रातून कोणालाही केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. अशोक चव्हाण दोन महिन्यांपूर्वी भाजपात दाखल झाल्यावर त्यांना या पक्षाने लगेचच राज्यसभेवर पाठविले असून तेथील सदस्यत्वाची शपथग्रहण केल्यानंतर त्यांनी आपल्या प्रभावक्षेत्रात काही सभा घेतल्या. पाटणूर येथे झालेल्या सभेत एका वक्त्याने चव्हाण यांना मंत्रिपदाची संधी असल्याचे सांगतानाच त्यांचा मंत्री झाल्यानंतर पहिला सत्कार पाटणूरमध्ये करण्याची घोषणाही केली.
हेही वाचा – “यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा
चव्हाण यांनी वरील दौर्यात मराठाबहुल गावांमध्ये जाणे टाळले होते. भोकर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये भाजपा व या पक्षाच्या नेत्यांबद्दल संतप्त भावना पसरली असून चव्हाण यांचे काही समर्थक जनतेचा रोष कमी व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर बारडच्या बाळासाहेब देशमुख-बारडकर यांनी अशोक चव्हाणांचे नेतृत्व दूरदृष्टीचे असल्याचे तसेच ते जपणे हे तुम्हा-आम्हा सर्वांचे कर्तव्य असल्याचे ठासून सांगितले. हा नेता बाजूला पडला तर सर्वांचे हाल होतील, याची जाणीव भोकर भागातील मतदारांना करून दिली जात असल्याचे दिसून आले.
भोकर मतदारसंघातील काही गावांमध्ये चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाला अनपेक्षित अनुभव आल्यानंतर चव्हाण यांची त्या भागातील यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे. भोकर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत चिखलीकर यांनी लक्षणीय मते घेतली. आता अशोक चव्हाण भाजपात गेल्यामुळे या पक्षाला वरील मतदारसंघात घसघशीत मताधिक्याची अपेक्षा असली, तरी निवडणूक प्रचाराच्या पूर्वार्धात तसे वातावरण होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर चव्हाण समर्थकांकडून आता भावनिक मुद्दे मतदारांसमोर मांडले जात आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे गावागावांमध्ये सांगितले जात आहे.