आयपीएलच्या अंतिम सामन्यात ‘गुजरात टायटन्स’ हा संघ विजेता ठरला. गुजरात काँग्रेसने विजयी संघाचे अभिनंदन करणारा फलक लावला. यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमचा उल्लेख सरदार पटेल स्टेडियम या जुन्या नावाने केला होता. अहमदाबाद पोलिसांनी चुकीची माहिती लिहिली असल्याचे सांगत हा बोर्ड काही तासांतच तिथून काढला. हे झाले या वर्षात विधासभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या गुजरातमधील दोन प्रमुख पक्षांत सुरू असलेल्या वादाचे ताजे उदाहरण.
भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात सध्या गुजरातमधील भिंती रंगावण्याची चढाओढ सुरू आहे. या स्पर्धेची सुरवात १३ मार्च रोजी झाली. या दिवशी भाजपाने राज्यातील भिंती कमळ हे चिन्ह काढून रंगावण्याच्या मोहिमेची घोषणा केली. त्याच महिन्यात कॉंग्रेसने वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी भिंती रंगवण्यास सुरवात केली. काँग्रेसने भाजपाने रंगवलेल्या कमळ चिन्हाचा बाजूच्या भिंतींवर गॅस सिलेंडर आणि त्याचे सतत वाढते भाव लिहिले. अहमदाबाद, जामनगर, हिम्मतनगर या गुजरातमधील प्रमख शहरांमध्ये दोन पक्षांमधील हे ‘वॉल वॉर’ दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसने ज्या भिंतीवर कमळ चिन्ह काढलेले दिसेल तिथे हाताचा पंजा काढण्यास सुरवात केली.
गुजरात काँग्रेसचे अहमदाबाद शहर अध्यक्ष निरव बक्षी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की ” विधानसभा निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आल्या आहेत. भिंतींवर कमळ चिन्हाच्या बाजूला हाताचा पंजा काढणे हा आमच्या निवडणूक प्रचार मोहिमेचा एक भाग आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस हा एक सक्षम पर्याय आहे हे आम्हाला लोकांना सांगायचे आहे”.
जेव्हा बक्षी यांना गुजरातमध्ये काँग्रेसने काढलेल्या गॅस सिलेंडरच्या भित्तीचित्रांविषयी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की “गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांविषयी आम्ही फलक लावले होते. ते फलक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही शहरातील भिंती रंगवण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या प्रचार मोहिमेंतर्गत कमळ चिन्ह काढून शहरातील भिंती रंगण्याच्या निर्णयाचा सामाजिकसंस्थांकडून विरोध करण्यात येत आहे. ‘मिशन स्मार्ट सिटी ट्रस्ट’ या सामाजिक संस्थेने याबाबत शहराच्या महापौरांकडे याबाबत तक्रारसुद्धा केली आहे.
या विषयावर गुजरात भाजपा मध्यम संजोजक यज्ञेश दवे म्हणाले की ” नरेंद्र मोदी स्टेडियम हा सरदार पटेल क्रीडा एनक्लेव या संस्थेच्या अंतर्गत येतो. या संस्थेच्या माध्यमातून गुजतातमध्ये आणखी १५ नवे क्रीडासंकुले उभारण्याचा मानस आहे. काँग्रेसकडे भाजपाच्या विरोधात एकही मुद्दा शिल्लक नसल्यामुळे ते लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. गुजरातमधील भाजपाच्या लोकप्रियतेला पर्याय नाही”.