यवतमाळ : नामांकन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले. जिल्ह्यात उमरखेड, वणी विधानसभा मतदारसंघात बहुरंगी तर उर्वरित पाच मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीत उमरखेड आणि वणी येथील बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने या दोन मतदारसंघात महाविकास आघाडीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. वणी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे संजय देरकर रिंगणात आहेत. काँग्रेसचे संजय खाडे यांनी येथे बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांना शिवसेना उबाठा व काँग्रेसने साथ दिली. येथे महायुतीकडून भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार आणि मनसेकडून राजू उंबरकर रिंगणात आहे. त्यामुळे येथे चौरंगी लढत होणार आहे.

आणखी वाचा-अमरावती : बंडखोरीमुळे महायुतीसमोर मतविभाजनाचा धोका कायम

उमरखेड मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे रिंगणात आहे. त्यांना काँग्रसेचेच माजी आमदार विजय खडसे यांनी उमेदवारी कायम ठेवून आव्हान दिले. या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे किसन वानखेडे निवडणूक लढवित आहेत. शिवाय भाजपचे बंडखोर, माजी आमदार राजेंद्र नजरधने हे मनसेकडून रिंगणात आहेत. त्यामुळे येथेही चौरंगी लढतीचे चिन्हं आहेत.

पुसद मतदारसंघात नाईक कुटुंबातील ययाती नाईक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे इंद्रनील नाईक विरूद्ध महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे उमेदवार शरद मैंद अशी थेट लढत होईल. आर्णी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे डॉ. विष्णू उकंडे यांनी माघार येथे महायुतीचे भाजप उमेदवार राजू तोडसाम विरूद्ध महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार जितेंद्र मोघे यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे संदीप बाजोरीया यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीतील पेच सुटला. येथे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर व महायुतीकडून भाजपचे मदन येरावार रिंगणात आहेत. शिवाय तिसऱ्या आघाडीकडून प्रहारचे बिपीन चौधरी हे रिंगणात आहेत. सध्यातरी येथे दुहेरी लढतीचे चिन्हं आहेत.

आणखी वाचा-East Vidarbha Assembly Constituency: पूर्व विदर्भातील पाच प्रमुख लढतींकडे राज्याचे लक्ष

दिग्रस विधानसभा मतदारसंघात महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संयज राठोड विरूद्ध महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत होईल. राळेगाव विधानसभा मतदारसंघातही महायुतीतील भाजप उमेदवार प्रा. डॉ. अशोक उईके विरूद्ध महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार प्रा. वसंत पुरके यांच्यात थेट लढत होणार आहे. आर्णी मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव रिंगणात असल्याने त्यांचा कस लागणार आहे. दिग्रसची जागा राखून स्वत:चे अस्तित्व आणि पक्षातील प्राबल्य कायम ठेवण्याचे आव्हान माणिकराव ठाकरे यांच्यापुढे आहे. ठाकरे तब्बल २० वर्षांनी विधानसभेच्या रिंगणात उतरले असून त्यांचा मुकाबला तुल्यबळ उमेदवार संजय राठोड यांच्यासोबत होत आहे. जिल्ह्यात सातही मतदारसंघातील लढती प्रतिष्ठेच्या होणार असल्या तरीही दिग्रसच्या लढतीकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wani umarkhed constituency the concern of mahavikas aghadi increased chowrangi ladhat in two places and direct fight in five constituencies print politics news mrj