West Bengal Violence on Waft Act 2025 : गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजुरी मिळाली. राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनंतर ८ एप्रिलपासून सुधारित वक्फ कायदा देशभरात लागू झाला. मात्र, या कायद्याला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसनं आता विरोधाची ठामपणे भूमिका घेतली आहे. राज्यात कुठल्याही परिस्थितीत वक्फ कायदा लागू होऊ देणार नाही, असा चंगच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांधला आहे. काही राजकीय पक्ष स्वत:च्या स्वार्थासाठी धर्मावर आधारित राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्ही त्यांच्या अजेंड्याला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

‘वक्फ’विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन

केंद्र सरकारने देशभरात सुधारित वक्फ कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला. या कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारी (तारीख ११ एप्रिल) हिंसक आंदोलन पाहायला मिळालं. रस्त्यावर लाठ्या-काठ्या घेऊन उतरलेल्या आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली. काही परिसरात वाहने जाळण्याच्या घटनाही घडल्या. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जमावाने त्यांच्यावर दगड-विटांचा मारा केला. या घटनेत जवळपास १० पोलिस जखमी झाले. हिंसक आंदोलकांनी बराच वेळ अनेक रस्त्यांवरील वाहतूक रोखून धरली होती. इतकंच नाही तर रेल्वेगाड्याही थांबवण्यात आल्या होत्या. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करावं लागलं. पोलिसांनी लाठीमाराचा सपाटा लावताच आंदोलकांनी घटनास्थळावरून पळ काढला. सध्या मुर्शिदाबादमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

मुर्शिदाबादमध्ये हिंसक आंदोलनाची घटना घडताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज शनिवारी (तारीख १२ एप्रिल) त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी वक्फ विधेयकावरील आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. तृणमूल काँग्रेसचे सरकार राज्यात हा कायदा लागू करणार नाही, असं ममतांनी ठामपणे सांगितलं. “काही राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी धर्मावर आधारित राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्ही त्यांच्या अजेंड्याला बळी पडू नका. राजकारणासाठी राज्यात दंगली भडकावू नका”, असं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

आणखी वाचा : Maharashtra Politics : पालकमंत्रीपदावरून शिंदे गटाचा उठाव? अमित शाहांच्या दौऱ्याआधी नेमकं काय घडतंय?

‘वक्फवरून केंद्र सरकारला जाब विचारा’

वक्फच्या कायद्यावरून जे लोक दंगली भडकावत आहेत, ते समाजाचे नुकसान करत आहेत. सरकार कोणत्याही हिंसक घटनांचे समर्थन करत नाही. दंगली भडकवणाऱ्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू”, असा इशारा ममतांनी आंदोलकांना दिला आहे. वक्फ कायदा राज्य सरकारने नाही, तर केंद्र सरकारने तयार केला आहे. आमच्या सरकारचाही या कायद्याला विरोध आहे, त्यामुळे जे लोक या कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत, त्यांनी यावर केंद्र सरकारला जाब विचारायला हवा, असंही ममतांनी स्पष्ट केलं आहे.

‘राज्यात वक्फ कायदा लागू होऊ देणार नाही’

दरम्यान, गेल्या बुधवारीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायद्याला राज्य सरकारचा विरोध असल्याचं म्हटलं होतं. कोलकात्यामधील एका कार्यक्रमात बोलताना ममता म्हणाल्या होत्या की, “कुठल्याही परिस्थितीत मी पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू होऊ देणार नाही. मला कल्पना आहे की वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यामुळे तुमच्या मनात असंतोष आहे, पण बंगालमध्ये असं काहीही घडणार नाही, ज्यातून फोडा आणि राज्य करा धोरणातून एखादी व्यक्ती सत्ता गाजवेल. राजकीय चळवळीसाठी काही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असतील, पण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.”

भाजपा नेत्यांची ममता बॅनर्जींवर टीका

शनिवारी मुर्शिदाबाद येथे घडलेल्या हिंसक घटनेवर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभेंदू अधिकारी यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांनी टीका केली आणि त्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मुर्शिदाबादसारख्या शहरात कुणी हिंसक आंदोलन करत असेल तर राज्य सरकार कोणतीही कारवाई का करीत नाही, मुख्यमंत्री अशा अराजकतेला का प्रोत्साहन देत आहेत; या दहशतवादी कृत्याचा निषेध करणारे कोणतेही निवेदन राज्य सरकारने का जारी केले नाही. पश्चिम बंगालचे लोक आणि तेथील संस्थांच्या सुरक्षेपेक्षा मतपेढीचे राजकारण जास्त महत्त्वाचे आहे का?” असा प्रश्न सुभेंदू अधिकारी यांनी विचारला. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करून पश्चिम बंगाल सरकारला जाबही विचारला. तसेच हिंसक आंदोलनात सहभागी असलेल्या दोषींवर कारवाईची मागणीही केली.

हेही वाचा : Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री फडणवीसांनी कसं शांत केलं?

‘आंदोलकांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झालाय’

सुवेंदू अधिकारी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहून विनंती केली की, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अनेक रेल्वेस्थानकांवर झालेल्या तोडफोडीच्या घटनांचा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मार्फत करावा. “वक्फ कायद्याच्या विरोधात आंदोलने करणाऱ्या एका समुदायाने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अनेक रेल्वेस्थानकांवर तोडफोड केली आहे. ही जाणीवपूर्वक घडवलेली विध्वंसक कृत्ये आहेत. या कारवायांचा उद्देश रेल्वेस्थानकांसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांवर हल्ला करून केवळ अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणे नाही, तर सार्वजनिक सुरक्षेला आणि राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण करणे आहे,” असं सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

पोलिसांचा आंदोलकांना कारवाईचा इशारा

पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. कुणी हिंसक आंदोलने करून पोलिसांवर दगडफेक करत असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) राजीव कुमार यांनी दिला आहे. मुर्शिदाबादमधील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत पोलिस महासंचालक म्हणाले, “कालपासून जंगीपूर परिसरात अस्वस्थतेचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि काही सांप्रदायिक तणावाच्या घटनाही घडल्या आहेत. कोणत्याही प्रकारची हिंसक घटना खपवून घेतली जाणार नाही. आम्ही परिस्थितीला अत्यंत गंभीरपणे हाताळत आहोत. प्रत्येकाचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. कोणीही अफवा पसरवून उगाच कायदा हातात घेऊ नये.” दरम्यान, ज्या भागांमध्ये हिंसाचार झाला, तिथे कलम १६३ लागू करण्यात आलं आहे.