Waqf Amendment Bill 2025 in Rajya Sabha : लोकसभेत बुधवारी (२ एप्रिल) तब्बल १२ तासांच्या वादळी चर्चेनंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. दुपारी १२ वाजता विधेयक मांडून चर्चेला सुरुवात झाली होती. ही चर्चा रात्री १२ वाजेपर्यंत चालू होती. रात्री या विधेयकार मतदान घेण्यात आले. यावेळी २८८ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर २३२ खासदारांनी विरोधात मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सभागृहात मतदानासाठी उपस्थित नव्हते. मात्र, लोकसभेत भाजपाप्रणित एनडीएकडे मोठे संख्याबळ असल्याने हे विधेयक सहज मंजूर झाले. लोकसभेत सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान नव्हते, मात्र आज (३ एप्रिल) केंद्र सरकारची राज्यसभेत खरी परीक्षा होणार आहे. हे विधेयक मंजुरीसाठी आज राज्यसभेत मांडले जाणार आहे.
राज्यसभेत भाजपाकडे व त्यांच्या मित्रपक्षांकडे किती संख्याबळ आहे? राज्यसभेत हे विधेयक सहज मंजूर होईल का? असे प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. राज्यसभेतील संख्याबळाबद्दल बोलायचे झाल्यास या वरिष्ठ सभागृहात एकूण २३६ सदस्य आहेत. तर, नऊ जागा रिक्त आहेत. या सभागृहात वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळवून देण्यासाठी मोदी सरकारला ११९ खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
एनडीएचे संख्याबळ किती?
लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. तसेच त्यांच्याकडे संयुक्त जनता दल, तेलुगू देशम पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व इतर लहान पक्षांचे समर्थन आहे. राज्यसभेत भाजपाचे एकूण ९८ खासदार असून त्यांच्या सर्व मित्रपक्षांच्या खासदारांची संख्या २७ इतकी आहे. त्यामुळे या विधेयकाच्या बाजूने राज्यसभेत १२५ मते पडू शकतात.
राज्यसभेत सदस्य असलेल्या अनेक पक्षांचा भाजपाला पाठिंबा आहे. त्यामध्ये उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा (एक खासदार), पत्तली मक्कल काची (एक खासदार), तमिळ मनिला काँग्रेसचा (टीएमसी-एम) एक खासदार सरकारच्या बाजूने आहे. नॅशनल पीपल्स पार्टी आणि रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी एक-एक खासदार आहे. या सर्वांचा भाजपाला पाठिंबा आहे. यासह दोन अपक्ष खासदारही एनडीएत आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे चार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभेत तीन प्रतिनिधी आहेत. तर, बाळासाहेबांची शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षाचा राज्यसभेत एक सदस्य (मिलिंद देवरा) आहे. तेलुगू देशम पार्टीचे राज्यसभेत दोन प्रतिनिधी आहेत. हे सर्वजण विधेयकाच्या बाजूने मतदान करू शकतात.
राज्यसभेत विरोधी पक्षांचं संख्याबळ किती?
संसदेच्या वरिष्ठ सदनात वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात अनेक पक्ष एकत्र आले आहेत. मात्र त्यांचे संख्याबळ एनडीएच्या संख्याबळापेक्षा कमी आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे राज्यसभेत २७ सदस्य आहेत. तर, तृणमूल काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. आम आदमी पार्टीचे राज्यसभेत १० प्रतिनिधी आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे १०, वायएसआर काँग्रेसचे सात, राष्ट्रीय जनता दलाचे पाच, समाजवादी पार्टीचे चार आणि शिवसेनेचे (ठाकरे) दोन खासदार सरकारच्या विरोधात उभे आहेत.
बीजेडी व एआयडीएमकेची भूमिका गुलदस्त्यात
यासह बीजू जनता दल व एआयडीएमकेचेही राज्यसभेत प्रतिनिधी आहेत. मात्र, त्यांनी अद्याप विधेयकाच्या बाजूने किंवा विरोधात भूमिका घेतलेली नाही. या खासदारांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे बीजेडी व ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्र कळघम हे पक्ष विधेयकाच्या बाजूने मतदान करणार की विरोधात हे अद्याप स्पष्ट नाही. त्याचबरोबर बीआरएस, बहुजन समाज पार्टी व एमएनएफ कोणत्या बाजूने मत देतात हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.