Rahul Gandhi on Waqf Amendment Bill : केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी (२ एप्रिल) लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं. या सुधारित विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर हे विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत बहुमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच जेरीस आणलं होतं. त्यामुळे ते मंजूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कसोटी लागली. दरम्यान, वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू असताना लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी कुठेही दिसून आले नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे हे दोन्ही नेते नेमके कुठे होते? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. सभागृहात हजर न राहिल्यानं मुस्लीम नेत्यांनी दोघांवरही टीका केली आहे.

वक्फ विधेयक दोन्ही सभागृहात बहुमतानं मंजूर

वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर करण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी (तारीख १ एप्रिल) विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीला लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. त्यांनी या विधेयकाला एकत्रितपणे विरोध करण्याची भूमिका मांडली. त्यानुसार विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती आखली. विशेष म्हणजे, भाजपानंही याच दिवशी त्यांच्या लोकसभेतील खासदारांना व्हिप जारी केला. लोकसभेत मतदानासाठी उपस्थित राहा, अशा सूचना त्यांनी खासदारांना दिल्या होत्या. विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शेवटपर्यंत एकमत झालं नाही. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात मतदान घेऊन त्याचं भवितव्य ठरलं.

आणखी वाचा : Waqf Amendment Bill : वक्फ बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकवायची होती का?

राहुल गांधी नेमके कुठे होते?

केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं. त्यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सभागृहात उपस्थित नव्हत्या. विशेष बाब म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी सभागृहातील चर्चेमध्येही सहभाग घेतला नाही. सरतेशेवटी ते मतदानासाठी हजर झाले. मात्र, मतदानानंतर राहुल गांधी यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. दरम्यान, लोकसभेत जेव्हा या विधेयकावर चर्चा सुरू होती, त्यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकावर टीका केली.

खरगेंनी केलं केंद्र सरकारला लक्ष्य

वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत बहुमाताने मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते राज्यसभेत चर्चासाठी ठेवण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहात भाषण केले आणि सरकारवर कठोर शब्दात टीका केली. या विधेयकात अनेक त्रुटी आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयक अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी आणले गेले आहे, असा आरोपही मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

राहुल गांधींवर मुस्लीम नेत्यांची टीका

वक्फ विधेयकावरील चर्चेत भाग न घेतल्यानं आणि सभागृहाचा त्याग केल्यानंतर मुस्लीम नेत्यांनी राहुल गांधींवर टीका केली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली आयएएनएसशी म्हणाले, “लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने सभागृहात वक्फ दुरुस्ती विधेयकावर सभागृहात कोणतेही विधान न केल्याने मला आश्चर्य वाटले. मला आशा होती की, काँग्रेसाच्या वतीने राहुल गांधी योग्य भूमिका घेतील.” तर, ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्ड (AISPLB) सरचिटणीस मौलाना यासूब अब्बास म्हणाले, “विरोधी पक्षनेते राहुल गांधी मुस्लिम समाजाच्या वतीने लोकसभेत बोलतील अशी अपेक्षा होती. किमान खासदार प्रियांका गांधी तरी चर्चेत सहभागी होतील, असं आम्हाला वाटत होतं. परंतु, या दोन्ही नेत्यांनी आमची निराशा केली आहे.”

मित्रपक्षाकडून राहुल गांधी आणि प्रियांका गांधींवर टीका

शुक्रवारी, मल्याळम वर्तमानपत्र ‘सुप्रभातम्’मध्ये काँग्रेसच्या केरळच्या मित्रपक्षाकडून एक लेख प्रकाशित करण्यात आला. त्यामध्येही राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना लक्ष्य करण्यात आलं. “बाबरी प्रकरणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून मुस्लिमांवर आणि देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर सर्वात मोठा हल्ला केला आहे. संघ परिवाराचा मुसलमानांवर आणि देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर केला गेलेला सर्वात मोठा हल्ला आहे… मात्र, वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी, ज्याकडे देशाने मोठ्या अपेक्षेने पाहतो, त्या काँग्रेसच्या व्हिप असूनही संसदेत आल्या नाहीत. हा एक कलंकच राहील. विधेयकावर चर्चा झाली, तेव्हा त्या कुठे होत्या हा प्रश्न कायम आमच्या मनात राहील. तसेच, देशाच्या एकतेला तडा देणाऱ्या विधेयकावर राहुल गांधी का बोलले नाहीत?” असा प्रश्नही संपादकीयमध्ये उपस्थित करण्यात आला.

प्रियांका गांधी नेमक्या कुठे होत्या?

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांच्या बाबतीत काँग्रेस सूत्रांनी सांगितले की, “कर्करोगाने ग्रस्त असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी त्या अमेरिकेत गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना सभागृहात उपस्थित राहता आलं नाही. प्रियांका गांधी यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या काही खासदारांना याबाबत माहिती दिली होती”, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

‘पंतप्रधान मोदीही कुठे उपस्थित होते’

एका काँग्रेस नेत्यानं इंडियन एक्स्प्रेसा सांगितलं की, “राहुल गांधी हे वक्फ विधेयक किंवा मणिपूरच्या चर्चेत सहभागी झाले नाहीत. याचा कुणाही राजकीय अर्थ लावू नये. या विधेयकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलले का? ते सभागृहात उपस्थित होते का? काँग्रेस पक्षाने या विधेयकाला जोरदार विरोध केला आणि आम्ही दोन्ही सभागृहात त्याविरुद्ध मतदान केले. राहुल गांधी हे काँग्रेस नेते आहेत, त्यांची आणि आमची भूमिका काही वेगळी नाही. ते बोलले का नाहीत हे महत्वाचं नाही. त्यांची भूमिकाही वेगळी नाही. ते बोलतात की नाही हे महत्त्वाचे नाही.” पुढील वर्षी केरळमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच राहुल गांधी यांना लक्ष्य केलं जात आहे”, असा आरोपही काँग्रेस नेत्याने केला.

हेही वाचा : Maharashtra Politics : मनसेच्या आक्रमकतेवर भाजपाचं मौन; शिंदेंना कमकुवत करण्याचा प्रयत्न?

वक्फ विधेयकावर राहुल गांधी काय म्हणाले?

“वक्फ सुधारणा विधेयक हे मुस्लिमांना मुख्य धारेपासून बाजूला सारण्यासाठी, त्यांचे वैयक्तिक फायदे, मालमत्ता, अधिकार हिरावून घेण्याचं हे एक शस्त्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संविधानावर केलेला हा हल्ला आहे. भविष्यात हे लोक इतर समुदायांनाही लक्ष्य करू शकतात. काँग्रेस पक्ष या कायद्याचा तीव्र विरोध करत आहे. कारण हे विधेयक भारताच्या मूळ संकल्पनेवर हल्ला करतं आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या कलम २५ चं उल्लंघन करतं”, असं राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधीचा बचाव

संसदेतील मणिपूरवरील चर्चेलाही राहुल गांधी उपस्थित नव्हते. याबाबत काँग्रेसच्या एका खासदाराने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “त्यांनी (राहुल गांधी) अनेकदा मणिपूरचा दौरा केलेला असून तेथील नागरिकांची भेट घेतली आहे. आपल्या प्रत्येक भाषणात राहुल गांधी हे मणिपूरच्या परिस्थितीबद्दल बोलत आहेत.” काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने सांगितले की, पक्षाचा सामूहिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. राहुल गांधी हे क्वचितच विधेयकांवरील चर्चेत भाग घेतात.

राहुल गांधींची संसदेत कितीवेळा आवाज उठवला?

खरेतर, गेल्या ११ वर्षात, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने केवळ दोनदा विधेयकांवर चर्चेत भाग घेतला आहे. २०२३ मध्ये त्यांनी महिला आरक्षण विधेयकावर संसदेत आपलं मत मांडलं होतं. गेल्यावर्षी लोकसभेच्या विरोधीपक्षनेतेपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी आतापर्यंत लोकसभेतील एकूण सात चर्चांमध्ये भाग घेतला आहे. यामध्ये दोनवेळा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर, एकदा अर्थसंकल्पावर, एकदा संविधानाच्या अमृतमहोत्सव प्रसंगी, याशिवाय वायनाडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेबद्दलही राहुल गांधींनी दोनदा संसदेत आवाज उठवला होता.