Waqf Bill : वक्फ बोर्ड विधेयकावर सल्ला मसलत करणाऱ्या संसदीय समितीकडे या प्रकरणी देशभरातून १.२५ कोटी सूचना आणि सल्ले आले आहेत. याबाबत भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की इतक्या मोठ्या संख्येने जर लोक याबाबत चर्चा करत असतील आणि मतप्रदर्शन करत असतील तर यामागे राबवली गेलेली मोहीम दिसून येते. तसंच या मागे परकीय शक्तींचा हातही असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जगदंबिका पाल यांना निशिकांत दुबेंचं पत्र

भाजपाचे खासदार निशिकांत दुबे हे वक्फ बोर्डासंदर्भात जी संयुक्त संसदीय समिती तयार करण्यात आली आहे त्याचे सदस्य आहेत. त्यांनी या समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की संसदीय समितीला देशभरातून सव्वा कोटी सूचना मिळाल्या आहेत. यामागे विशिष्ट टूलकिट किंवा मोहीम असू शकते. जगदंबिका पाल यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रकरणी गृहखात्याला हे सांगावं की या प्रकरणाची चौकशी करा. ही कोण माणसं आहेत ज्यांनी वक्फ बोर्डासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज पाठवले आहेत? हे समोर आलं पाहिजे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्यात आलं तेव्हा मुस्लिम मौलवींनी हे आवाहन केलं होतं की या विरोधात जास्तीत जास्त अर्ज दाखल करा. तसं घडलेलं दिसतं आहे. मात्र यामागे परकिय शक्ती, झाकिर नाईक यांसारख्यांचा हात असू शकतो असा संशय निशिकांत दुबेंनी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा- ‘वक्फ’ विधेयकामागे दडलेय काय?

व्हायरल व्हिडीओंची झाली चर्चा

संसदेत जेव्हा हे सुधारणा विधेयक मांडण्यात आलं त्यानंतर काही व्हिडीओही व्हायरल झाले होते ज्यामध्ये वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाचा विरोध करा असं सांगितलं जात होतं. निशिकांत दुबे यांनी संशय व्यक्त केला आहे की यामागे आयएसआय आणि चीन यांचा हात असू शकतो. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच झाकीर नाईक सारख्या लोकांनी कसा यांच्यावर प्रभाव पाडला ते देखील समोर आलं पाहिजे. निशिकांत दुबे म्हणाले, विरोधातल्या सूचनांचा हा ट्रेंड काळजीत पाडणारा आहे. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

निशिकांत दुबे यांनी आणखी काय म्हटलं आहे?

आमची संसदीय समिती सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो त्या सूचनांचा विचार करेल. मात्र मुस्लिम समुदायाकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर सूचना आल्या कशा काय? हे आधी कळलं पाहिजे. संसदीय समिती वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा अभ्यास करते आहे. लोकसभेत हे विधेयक मांडण्यात आलं होतं. या विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शवला. त्यानंतर हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे. संसदीय समितीने याबाबत देशभरातून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. सव्वा कोटी हरकती मुस्लीम समाजाने घेतल्याने निशिकांत दुबे यांनी संशय व्यक्त केला आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.