वर्धा : विधानसभा निवडणूक लढवून आमदार होण्याची ईच्छा राजकीय मंडळी बाळगून असतात. त्यात महिला पदाधिकारी आल्याच. यावेळी तर कधी नव्हे एव्हडी संख्या महिला नेत्यांची दिसून येत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर म्हणतात प्रथमच मोठ्या संख्येने महिला नेत्या आमदार होण्यास सरसवल्या आहेत. काँग्रेसकडे जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून ईच्छुक महिला उमेदवारांचे अर्ज आले आहेत. वर्धा मतदारसंघातून महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांनी मुलाखत देतांना वर्ध्यातून काँग्रेसने महिला उमेदवार दिला पाहिजे असा आग्रह धरला. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर सर्वाधिक काळ महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषविण्याचा विक्रम आहे. कदाचित देशात त्या २७ वर्ष या पदावर राहलेल्या एकमेव असाव्या, असे म्हटल्या जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या प्रा. सुजाता सबाने झाडे या ईच्छुक आहेत. त्या अमरावती येथे प्राध्यापक असल्या तरी माहेर सबाने कुटुंब हे राजकीय मातब्बर म्हणून ओळखल्या जाते. तीच पुण्याई त्या सांगतात. म्हणजे महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम सभेचे अध्यक्ष राहलेले आजोबा महादेवराव सबाने, काका माजी आमदार माणिकराव सबाने, दुसरे काका सुरेश सबाने हे नगरसेवक व महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष, वडील सरपंच तसेच त्या स्वतः विद्यार्थी नेत्या व नगरसेवक, प्रदेश काँग्रेस सचिव राहून चुकल्याचे सांगतात. देवळीतून महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष, माजी जि. प. अध्यक्ष चारुलता टोकस यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच खळबळ उडाली. कारण या ठिकाणी सलग पाच टर्मपासून आमदार असलेले त्यांचे मावसभाऊ रणजित कांबळे हे आमदार आहेत. ही माझ्या आईची जागा मला आता परत मिळावी असा सूर आहे. माजी राज्यपाल दिवं. प्रभाताई राव यांच्या कन्या असलेल्या चारूलता व कांबळे यांच्यात विस्तव जात नाही. २०१९ मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या ताई आता विधानसभेसाठी सज्ज झाल्या आहेत. आर्वीत प्रिया शिंदे तोडसाम यांनी अर्ज दाखल केला असून गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम सादर करीत त्या चर्चेत आल्यात. हिंगणघाटमधून विजया धोटे व अर्चना भोमले यांचे अर्ज आले आहेत.

हेही वाचा : अमरावती जिल्‍ह्यात काँग्रेसच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्‍ये चढाओढ

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे लढण्यास महिला उमेदवार पुढे आल्या आहेत. यापैकी हिंगणघाट ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणे निश्चित आहे. देवळीत रणजित कांबळे यांचा पत्ता कट करीत तिकीट प्राप्त करण्याचे मोठे आव्हान टोकस यांना झेलायचे आहे. थेट गांधी कुटुंबात परिचय असणाऱ्या चारूलता एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व व अजातशत्रू म्हणून ओळखल्या जातात. दादागिरी संपवायची असा सूर आहे. त्यामुळे सर्वाधिक लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha assembly constituency congress female leaders interested to contest vidhan sabha print politics news css