वर्धा : जातीय समीकरणाचा बोलबाला गृहीत धरून उमेदवारी दिल्या जाते. पण मतदार तसा विचार करतो का, असा प्रश्न वर्धा व हिंगणघाट मतदारसंघातील निकालातून उपस्थित होतो. वर्ध्यात पक्षनिष्ठा व जातीय समीकरणातून आघाडीने शेखर शेंडे यांना इतरांना बाजूला सारत उमेदवारी दिली. वर्धा, सेलू हा तेली समाजाचा किल्ला म्हणून चर्चा होत असते. मात्र या क्षेत्रातील कुणबीबहुल म्हटल्या जाणाऱ्या सुरगाव, कोटंबा, जयपूर व अन्य गावांत शेंडे यांना कुणबी उमेदवार असलेल्या युतीच्या डॉ. पंकज भोयर यांच्यापेक्षा सरस मतदान झालेले आहे.

पवनार, बोरगाव, सालोड या व अन्य काही तेलीबहूल गावांत भोयर बाजी मारून गेले. म्हणजेच हा पक्षीय प्रभाव म्हटल्या जातो. तसेच शेंडे यांना सरकारविरोधी नाराजी पथ्यावर पडल्याचा सूर उमटतो. तसेच अपक्ष डॉ. सचिन पावडे हे कुणबी समाजाचेच उमेदवार होते. म्हणून त्यांच्यात व भोयर यांच्यात कुणबी मतांचे विभाजन होऊन तेली समाजाचे शेंडे सहज निवडून येतील, असा होरा काँग्रेसने ठेवला होता. पण पावडे यांना केवळ आठ हजार मते पडली. आता ते समाजमतांचे विभाजन नसून भाजपविरोधी मतांचे विभाजन ठरले व भोयर विजयी झाल्याचा तर्क मांडल्या जात आहे.

हेही वाचा – Eknath Shinde Resignation : मुख्यमंत्रीपदावरून शिंदे यांची माघार? शिवसेनेचा आक्रमकपणा मावळला

मुळात पावडे यांना उभे राहण्याचा हट्ट धरणारे कोण, हे पण तपासल्या जात आहे. निवडणुकीचे तंत्र समजणारा एकही व्यक्ती सोबत नाही, पुस्तकी पंडितांचा घोळका, निवडणूक आली की सुपारी घेण्यासाठी टपलेले, असे व काही पांढरपेशी डॉक्टरांचा घात करून गेल्याचा ठपका ठेवल्या जात आहे. लोण्याचा गोळा खाऊन आता मिटक्या मारल्या जात आहे, असे पावडे समर्थक खुलेपणाने बोलत आहे. निगर्वी, सुसंस्कृत, उच्चशिक्षित व सहज संवादी, अशा प्रतिमेस जर पक्षीय मतांची जोड मिळाली असती तर चित्र वेगळे असते. जात पण कामात आली नाही, असे डॉक्टरांच्या पराभवाचे वर्णन होते. वर्ध्यात शेंडे कुटुंबाचा व काँग्रेसचा प्रभाव कामी आला नाही. स्वकीयांनीच शेंडे यांचे केलेले प्रतिमाभंजन त्यांना नेहमी आड येत गेले, हा त्याचा पुरावा असल्याची प्रतिक्रिया आहे.

हिंगणघाट येथे भाजपचे समीर कुणावार मी केवळ स्त्री व पुरुष या दोनच जाती मानतो, असे जाहीरपणे सांगत सर्व समाजातून पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट करीत होते. या मतदारसंघात मोठ्या संख्येत तेली समाजाचे प्राबल्य असा कयास ठेवून आघाडीने अतुल वांदिले यांना उमेदवारी दिली. पण कुणावार यांचा मी सर्व समाजाचा उमेदवार हा दावा मतदार खरं करून गेलेत. माजी आमदार राजू तिमांडे यांनी केलेली बंडखोरी त्यांच्याच तेली समाजाने नाकारल्याची बाब त्यांना प्राप्त मतातून स्पष्ट होईल. मात्र एक उमद्या व नव्या दमाच्या नेतृत्वावर त्याचा घाव बसला. राष्ट्रवादीचे तुकडे-तुकडे झाले. कुणावार यांनी केलेल्या कामावर व मेडिकल कॉलेजवर मते मागितली. त्यास हिंगणघाटकरांनी पावती दिल्याचे त्यांना मिळालेले ३० हजारावर मताधिक्य स्पष्ट करते.

हेही वाचा – गिरीश महाजन यांच्यासमोर ३० वर्षांत प्रथमच विरोधक ‘एक लाखांचा’ धनी

स्वतःच्या समाजाची उणीपुरी १०० घरे असूनही कुणावार बाजी मारून गेले. जातीय समीकरण ठेवत राजकीय डाव मांडणारे अपयशी ठरले. देवळीत पण तेली समाजास प्रतिनितिधित्व म्हणून भाजपने राजेश बकाने यांना उमेदवारी दिली. पण त्यांच्याही पदरात कुणबी पट्टा म्हणून ओळख असलेल्या गावांनी कमळे टाकली.