वर्धा : राज्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर डॉ. पंकज भोयर यांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद लाभणार काय व सहकार क्षेत्र ते मुठीत ठेवणार काय, या दोन प्रश्नांनी उचल खाल्ली आहे.
अनपेक्षितपणे मंत्री झाल्यानंतर वर्धा शहरात रात्रीच चांगला जल्लोष झाला. केवळ भोयर समर्थकच नव्हे तर वर्धा मतदारसंघातील निस्सीम भाजपप्रेमी व कार्यकर्ते यात सामील झाले होते. भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची नावे निश्चित करताना ५० आमदारांची यादी तयार झाली होती. कुणबी निकषावर भोयर पुढे सरकल्याचे आता सांगण्यात येते. दुसरी बाब म्हणजे सहकार क्षेत्रात भाजपचे नगण्य असलेले स्थान मजबूत करण्याची जबाबदारी डॉ. भोयर हे आवडीने स्वीकारतील, असा होरा. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे भोयर यांचा राजकारणातील क्रमांक एकचा विरोधक सहकार गट समजल्या जातो. त्यासही विरोधाची कमी व वैरत्वाची छटा अधिक आहे.
सहकार नेते माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्या संस्थेत भोयर यांचे वडील डॉ. राजेश भोयर हे प्राचार्यपदी असताना त्यांना या पदावरून काही ठपका ठेवत राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते. तेव्हाच भोयर कुटुंबात वैरभावना रुजली. पुढे सहकार विरोधक म्हणून भोयर हे प्रभाताई राव यांच्या गटात येत राजकारणात आले. या गटात आयुष्यभर आमदार होणे शक्य नसल्याचे कळून चुकल्यावर त्यांनी दत्ता मेघे यांचे बोट धरून भाजपमध्ये प्रवेश व नितीन गडकरी यांच्या आशीर्वादात २०१४ मध्ये आमदारकी मिळविली. पण गडकरी यांचे जिल्ह्यातील सहकार गटाविषयी असलेले ममत्व लक्षात घेत प्रथम सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास संपादन केला. नंतर अलीकडच्या काळात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे सख्य राखले. या चतुरपणे केलेल्या राजकीय वाटचालीत डॉ. भोयर यांचे लक्ष्य सहकार नेतेच राहिले.
हेही वाचा – राणा दाम्पत्याच्या महत्वाकांक्षेला राजकीय लगाम
जिल्हा सहकारी बँक हा सहकार गटाचा गड. तो खिळखिळा झाला. त्याला संजीवनी देण्याचे काम भोयर यांनी ताकदीने सुरू केले. येथे ताकद लावून फायदा काय, शेवटी निवडणूक झाली तर सहकार गटाचाच ताबा परत येणार नं, या प्रश्नावर ते उत्तर देत की या बँकेशी समाजातील मोठा वर्ग जुळला असून त्यांना आर्थिक झळ बसली आहे. या लोकांना न्याय मिळावा म्हणून आपण जिल्हा बँकेस मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. असे भोयर यांचे कथन. आणि राज्य सहकार खात्यामार्फत या बँकेस पूर्वपदावर आणण्याचे भोयर यांचे प्रयत्न सर्वच जाणतात. आता मंत्रिपद आल्यानंतर या बँकेवर भाजपचा पगडा अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे.
दुसरी बाब बाजार समित्यांवार वर्चस्वाची. सेलू व वर्धा बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या तेव्हा भोयर व रामदास तडस हे सर्व ताकदीनीशी या निवडणुकीत उतरले होते. मात्र अपयश आले. आता आर्वी वगळता अन्य सर्व बाजार समित्या राष्ट्रवादी म्हणजेच सहकार गटाकडे आहेत. म्हणून या क्षेत्रात डॉ. भोयर हे आपल्या मंत्रिपदाची ताकद लावून भाजपचा झेंडा फडकविण्याचे धोरण राबविणार, हे निश्चित. गृहमंत्री असलेले अमित शहा हे सहकार खाते पण सांभाळतात. त्यांची वर्ध्यात होणारी सभा वेळेवर रद्द झाली होती. पण या सभेत जिल्हा बँक व भूविकास बँकेच्या पुनरुज्जीवनाची बाब भोयर हे ठासून मांडणार होते. त्यांचे भाषण याच पैलूने होणार होते, असे एका ज्येष्ठ भाजप नेत्याने स्पष्ट केले. म्हणून सहकार क्षेत्रावरील भाजपची पकड घट्ट करणे हा राजकीय हेतू व सहकार गटाच्या नेत्यांना चीत करण्याचा व्यक्तिगत हेतू मंत्री भोयर यापुढे ठेवणार, असे बोलल्या जाते.