वर्धा : राजकीय अस्तित्वाच्या लढाईत शरद पवार नव्या चिन्हानिशी परत वर्धेच्या मैदानात उतरले आहेत. १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने वर्ध्याची जागा लढविली होती. त्यानंतर तब्बल २५ वर्षाने ही जागा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष लढवित आहे.

काँग्रेस सोडून स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व तयार करण्याचा निर्णय २५ वर्षांपूर्वी शरद पवार यांनी घेतला होता. १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. ‘एकला चलो रे’ म्हणत त्यांनी राज्यभरात लोकसभेसाठी उमेदवार उभे केले होते. त्यावेळी वर्ध्यातून त्यांचे विश्वासू दत्ता मेघे हे उभे होते. सोबतीला रामदास तडस हे पण होते. १९९९ ला झालेल्या त्या निवडणुकीत मेघे यांना १ लाख ४९ हजार मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. तर काँग्रेसच्या प्रभा राव निवडून आल्या होत्या. भाजपचे सुरेश वाघमारे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आता तब्बल २५ वर्षांनंतर शरद पवारांच्या राजकीय अस्तित्वाचा लढा परत सुरू झाला आहे. यावेळी वर्धेची जागा त्यांनी महाआघाडीकडून स्वत:च्या पक्षासाठी मागून घेतली. मात्र यावेळी तुतारी हे नवे चिन्ह त्यांच्या पक्षाला मिळाले आहे.

हेही वाचा – शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरे विरोधाची तलवार म्यान

२५ वर्षांपूर्वी त्यांनी घेतलेले घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार या गटाकडे आहे. त्यामुळे ‘नवे चिन्ह, नवा लढा’ अशी शरद पवारांची उमेद दिसून येते. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले दत्ता मेघे, रामदास तडस आता भाजपचे शिलेदार आहेत. तर या सर्व प्रवासात प्रा. सुरेश देशमुख हेच पवारांच्या सोबत असल्याचे आजचे चित्र आहे. मात्र त्यावेळी विरोधात असणारा काळे गट आज पवारांच्या सोबत आला. अमर काळे यांनाच आपल्या पक्षाची उमेदवारी देत पवारांनी पंजाचा गढ मानल्या जाणाऱ्या वर्धा मतदारसंघात तुतारी फुंकली.

हेही वाचा – चावडी : राणे आणि भुजबळांची वेगळी तऱ्हा

२५ वर्षांपूर्वी सोबत असणारे तडस आज भाजपचे तर त्यावेळी विरोधात असणारे काळे आज पवारांचे उमेदवार आहे. आमुलाग्र राजकीय स्थित्यंतराचा हा एक वेगळाच नमुना पुढे आला आहे. माजी आमदार असलेले हर्षवर्धन देशमुख, सुरेश देशमुख व राजू तिमांडे हे तिघेही आज पवारांसोबत आहे. घड्याळ घेवून गेलेल्या अजित पवारांचे जिल्ह्यात नामोनिशाण नाही. त्यामुळे वर्धा मतदारसंघ हा पवारांच्या नव्या पक्षाला पुढे किती साथ देतो, हे ठरविणारी ही निवडणूक राहील. काँग्रेसचाच नेता उमेदवार म्हणून पदरात पाडून घेत पवारांनी आपली लढाई दमदार केली आहे. बरीच वर्षे त्यांचेच पट्टशिष्य राहिलेले रामदास तडस यांच्याशी त्यांची लढत आहे. त्यांचेच विश्वासू राहिलेले दत्ता मेघे हे जिल्ह्यास काँग्रेसमुक्त करण्याचे स्वप्न ठेवून आहे. २५ वर्षांनंतर शरद पवार हे वर्धा मतदारसंघात काय चमत्कार घडविणार, हे पुढेच दिसेल.

Story img Loader