Pratibha Dhanorkar in Warora Vidhan Sabha Constituency चंद्रपूर : वरोरा मतदारसंघात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणताच काँग्रेस तसेच धानोरकर कुटुंबात बंडाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असून डॉ. चेतन खुटेमाटे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. भाजपने माजी मंत्री संजय देवतळे यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने नाराज विधानसभा अध्यक्ष रमेश राजूरकर मनसेच्या संपर्कात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुणबीबहुल वरोरा मतदारसंघात आजवरच्या तेरापैकी दहा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली आहे. १९७८ मध्ये निळकंठराव शिंदे, १९८० व १९८५ या सलग दोन निवडणुकीत शेतकरी संघटनेचे ॲड. मोरेश्वर टेमुर्डे आणि २०१४ मध्ये शिवसेनेचे बाळू धानोरकर विजयी झाले होते. या चार निवडणुकांचा अपवाद वगळता या मतदारसंघावर देवतळे कुटुंबाचेच वर्चस्व राहिले आहे. २०१९ मध्ये काँग्रेस खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांनी पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली व जिंकूनही आणले. आता प्रतिभा धानोरकर चंद्रपूरच्या खासदार आहेत व त्यांनी भाऊ प्रवीण काकडे यांच्यासाठी पक्षश्रेष्ठी आणि पक्षांतर्गत विरोधकांशी संघर्ष करून उमेदवारी खेचून आणली. काकडे यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. याच नाराजीतून वरोरामध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. काँग्रेसचे डॉ. चेतन खुटेमाटे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम आहेत. त्यांना संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा आहे.

हेही वाचा >>>तिकीट वाटपात विजय वडेट्टीवार यांची खासदार धानोरकर यांच्यावर मात

खासदार धानोरकर यांचे भासरे अनिल धानोरकर काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. काँग्रेस नेते त्यांच्यासाठी सकारात्मक होते. मात्र खासदारांचा काकडे यांच्यासाठी आग्रह व भासरे धानोरकर यांना टोकाचा विरोध, यासमोर पक्षाला नमते घ्यावे लागले. अनिल धानोरकर आता वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती आहे. भाजपने करण देवतळे यांना उमेदवारी दिल्यामुळे दोन वर्षांपूर्वी मनसेमधून भाजपमध्ये आलेले वरोरा विधानसभाप्रमुख तीव्र नाराज आहेत. मनसेने प्रवीण सुर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, सुर यांची निवडणूक लढण्याची तयारी नसल्याने राजूरकर मनसे नेत्यांच्या संपर्कात आहेत. ते मनसेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे.

वरोराचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली हेदेखील निवडणूक लढणार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुकेश जीवतोडे बंडाच्या तयारीत आहेत. त्यामुळे वरोरा मतदारसंघात बंडखोरांची फौज बघायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warora assembly constituency dispute in congress mla pratibha dhanorkars family and party for brother praveen kakade ticket for akola washim maharashtra assembly election 2024 print politics news amy