Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा या पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक त्या लढवत आहेत. वायनाडमधून त्यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचाराला सुरुवातही केली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून निवडणूक लढवली होती. या दोन्हीही ठिकाणी त्यांचा विजय झाला. मात्र, यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे वायनाडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. आता या मतदारसंघात प्रियांका गांधी या निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.
१३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वायनाडच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रियांका गांधी उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांच्यासह दिल्लीतील काँग्रेसचे बडे नेतेही हजेरी लावणार आहेत. मात्र, सध्या प्रियांका गांधी या वायनाडमधील लोकांच्या भेटी गाठी घेत लोकांशी संवाद साधत आहेत. तसेच निवडणुकीचा अर्ज दाखल केला त्या दिवशी जाहीर सभेत बोलताना त्यांनी असं म्हटलं होतं की, मी गेली ३५ वर्ष लोकांसाठी प्रचार करत मतदान मागितलं. मात्र, यावेळी स्वत:साठी मतदान मागत आहे, असं म्हणत वायनाडच्या लोकांना त्यांनी भावनिक आवाहन केलं होतं.
हेही वाचा : Bhandara Gondia Assembly Constituency : उमेरडमध्ये शिवसेनेचे राजू पारवे अधांतरी, भाजपच्या पारवेंना उमेदवारी
दरम्यान, प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासाठी वायनाडची जागा सर्वात सुरक्षित जागांपैकी एक मानली जाते. कारण वायनाड काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. याचा काहीसा प्रत्यय हा प्रियांका गांधी या गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या होत्या, तेव्हा त्यांना आला होता. कारण उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनीही वायनाडच्या लोकांशी भावनिक संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, वायनाडच्या लोकांसाठी दोन खासदार असतील, कारण मी खासदार झालो आणि त्यानंतर आता निवडून येणारा एक खासदार असेल.
प्रियांका गांधींना कोणाचं आव्हान?
भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवक नव्या हरिदास या प्रियांका गांधींच्या विरोधात वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. नव्या हरिदास यांचे कुटुंब संघ परिवाराशी निगडीत आहे. यासंदर्भात बोलताना नव्या हरिदास यांनी आरएसएसच्या कार्यात भाग घेतल्याचेही सांगितलं होतं. २०१५ मध्ये केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने वायनाडमध्ये प्रियांका गांधी यांना मोठं आव्हान दिलं असून नव्या हरिदास यांच्या विजयासाठी मोठी रणनीती आखली आहे. तसेच भाजपाकडून नव्या हरिदास यांच्यासाठी अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे प्रियांका गांधी यांना या निवडणुकीत तगडं आव्हान असणार आहे. दरम्यान, सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखालील एलडीएफचे उमेदवार सत्यन मोकेरी आहेत. जे वायनाडमधील अलीकडील भूस्खलनाच्या पुनर्वसनासाठी कोणतीही मदत न दिल्याबद्दल भाजपा-शासित केंद्राला दोष देत आहेत.