बिपीन देशपांडे

एक गठ्ठा दलित मतांची ताकद सत्तेच्या राजकारणापासून वंचित राहिलेल्या इतर सामाजिक घटकांतील व्यक्तींच्या मागे उभी करून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा “अकोला प्रारूप” चा प्रयोग यशस्वीपणे करून दाखवणारे अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने नवी समीकरणे जुळवून आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेसोबतच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेसकडेही युती-आघाडीसाठी वंचितने प्रस्ताव पाठवला आहे. त्याला ठाकरेंच्या शिवसेनेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, तर काँग्रेसने अद्याप थेट भूमिका जाहीर न करता नेहमीच्या “थांबा आणि प्रतीक्षा करा”या नीतीने वंचितला अधांतरी ठेवले आहे. त्यामुळे वंचितने स्थानिक पातळीवरही एखाद्या नेत्यासोबत आघाडीचा पर्याय ठेवल्याची माहिती आहे.

येत्या काळात मुंबई, नाशिकसह औरंगाबाद महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. एमआयएमसोबत काडीमोड घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने नव्याने समीकरण जुळवून आणण्यासाठी गोळाबेरीज सुरू केली. मैत्रीसाठी एका राजकीय पक्षाच्या शोधात असलेल्या वंचितपुढे मूळ शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती अनुकूल करण्याच्या दृष्टीने पर्याय निर्माण झाला. भाजपसोबत बहुसंख्येने गेलेल्या एकनाथ शिंदेंच्या “बाळासाहेबांची शिवसेने”ऐवजी अॅड. आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंपुढची परिस्थिती ओळखून त्यांच्या शिवसेनेसमोर आघाडीचा पर्याय ठेवला आहे. त्याला उद्धव ठाकरेंचा टोकदार होत असलेला भाजप विरोधाचा सूर हे प्रमुख कारण आहे. पण दुसरीकडे ठाकरे यांचे शरद पवार यांच्याशीही सख्य आहे. वंचितला मात्र भाजपसोबत राष्ट्रवादीही सोबत नको आहे. पवारांऐवजी वंचितला काँग्रेस जवळची वाटू लागली आहे. त्यांनी काँग्रेसपुढेही आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे.

हेही वाचा : रायगडमध्ये बंडखोरांची आमदारांची कोंडी करण्यासाठी ठाकरे यांची विरोधीपक्षांना रसद

अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे आतापर्यंतचे राजकारण पाहता त्यात भाजपपेक्षा काँग्रेस विरोध टोकदार राहिला आहे. शिवाय अकोल्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वंचितचा वरचष्मा राहण्यामागे भाजप सदस्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली असून त्यातून दोन्ही पक्षांमध्ये छुपी युती असल्याचा संदेश राज्यभर गेला आहे. त्यामुळे काँग्रेसने वंचितबाबतची थेट भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नसून, सध्या त्यांचे वरिष्ठ पातळीवरील नेते राहुल गांधी यांच्या पुढील आठवड्यात महाराष्ट्रात प्रवेश करत असलेल्या भारत जोडो यात्रेच्या तयारीत व्यस्त आहेत.

औरंगाबादमध्ये वंचित व एमआयएम यांच्या आघाडीमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची सद्दी संपुष्टात आली. अनपेक्षितपणे इम्तियाज जलील हे खासदार झाले. पण पुढे काहीच दिवसात वंचित व एमआयएम यांच्यात काडीमोड घडून आला. वंचितला एका राजकीय मैत्राची गरज निर्माण झालेली असतानाच शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्या पक्षाचे धनुष्यबाणाचे चिन्हही हातून निसटले. या सर्व राजकीय घडामोडी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर असतानाच गतिमान झाल्या. त्यात मुंबई मनपा ताब्यात मिळवण्यासाठी भाजपने लावलेला जोर, राज ठाकरेंशी वाढत ठेवण्यात येत असलेली जवळीक पाहता अॅड. आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे नव्याने शिवशक्ती व भीमशक्तीचा प्रयोग करण्याच्या दृष्टीने आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याला ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.

हेही वाचा : कुणाल पाटील यांचा धुळे ग्रामीण मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन

पक्षाकडून शिवसेनेपुढे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढे व काँग्रेससमोर आघाडीसाठी प्रस्ताव ठेवला आहे. ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, तर काँग्रेसकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. पक्षीय पातळीवर सध्या बुथनिहाय संघटनात्मक बांधणी सुरू आहे. एमआयएमविषयी मुस्लिम समुदायातच मोठी नाराजी असून अनेकजण पक्षाशी संपर्कात आहेत. पक्षाने नियुक्त केलेले निरीक्षक फारूक अहमद कामकाजाचा आढावा घेत आहेत. औरंगाबाद मनपा निवडणुकीसाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या रामभान जाधव विकास आघाडीचा प्रस्ताव आला आहे. – योगेश बन, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी.

Story img Loader