लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात जोरदार राजकारण रंगू लागले आहे. प्रभू राम आणि राम मंदिराला निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचे नेते एकही संधी सोडत नाही आहेत. द्रमुक नेते ए. राजा यांनी भगवान राम आणि राम मंदिरासंदर्भात आक्षेपार्ह विधाने केली असतानाच एकेकाळी भाजपामध्ये असलेले टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही भाजपाचा राम मंदिराचा मुद्दा हवेत उडाल्याचा दावा केलाय. दुसरीकडे मध्य प्रदेशात भारत जोडो न्याय यात्रेवर असलेले राहुल गांधी म्हणाले की, ‘मोदीजींची इच्छा आहे की, देशातील तरुणांनी दिवसभर मोबाइल फोन वापरावा, जयश्री रामचा जप करावा आणि उपाशी मरावे.’ त्यामुळे यावर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ”राजा म्हणाले की, मी जय श्रीराम आणि भारत माता की जय कधीही स्वीकारणार नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका आणि मल्लिकार्जुन खरगे हे सगळे ए राजा यांच्याशी सहमत आहेत का?” असा सवालही भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे. पुढे त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, द्रमुकने इतर कोणत्याही धर्माविरोधात अशी टिप्पणी करावी का? ते म्हणाले की, आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. याबरोबरच त्यांनी इंडिया आघाडीबाबतही प्रश्न उपस्थित केले.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, “बिल्किस बानोच्या सहा महिन्यांच्या बाळाची हत्या करण्यात आली होती आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. पण जेव्हा या प्रकरणातील दोषी तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा जय श्री राम आणि भारत माता की जय असा जयघोष करीत होते, आणि अशा जयघोषातच जमावाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. जय श्रीराम आणि भारत माता की जय या घोषणांचा असाच अर्थ असेल, तर आम्ही तो कधीच स्वीकारणार नाही. तामिळनाडू ते कधीही मान्य करणार नाही,’’ असंही ए राजा यांनी सांगितलं आहे. “तुम्ही आम्हाला प्रभू श्रीरामाचे शत्रू असल्याचं म्हणालात तरी हरकत नाही”, असंही त्यांनी अधोरेखित केले.
पुढे राजा म्हणाले की, ”त्यांना जे ‘रामायण’ शिकवले गेले ते वेगळे होते. सर्व सामंजस्य आणि बंधुत्वावर आधारित होते. “आम्हाला जे शिकवले आहे ते म्हणजे राम गुहान, सुग्रीव आणि विबिशन यांना भाऊ मानतात. कंबा रामायण हेच आहे, सर्व जातींचे लोक एक आहेत, शिकारी आणि माकडदेखील नातेवाईक आहेत,” असेही ते म्हणालेत. “मी रामायणावर विश्वास ठेवत नाही, मी रामावर विश्वास ठेवत नाही, पण मानवी सुसंवादासाठी आम्हाला शिकवलेलेच खरे रामायण आहे, पण जय श्री राम तुम्ही म्हणताय, छे.. मूर्ख आहात,” असेही राजा म्हणालेत. अदाणींबाबत हिंडेनबर्गचा अहवाल, बिल्किस बानो आणि देशावरील वाढते कर्ज यासह विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर केंद्रातील भाजपाकडे नाही. “आम्ही काहीही विचारले तरी उत्तर फक्त जय श्री राम आहे,” असंही म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांनी राजा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.
इंडिया आघाडीचा हाच अजेंडा आहे का?
“भाजपाच्या राम मंदिर मुद्द्याची हवाच निघून गेली आहे. पहिल्या दिवशी पाच लाख लोकांनी राम मंदिराला भेट दिली होती, मात्र आता फक्त हजार-दोन हजार लोक भेट देत आहेत”, असे टीएमसीचे खासदार शत्रुघ्न सिन्हा म्हणालेत. त्यानंतर भाजपानेही यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय परंपरांवर प्रश्न उपस्थित करणे आणि हिंदू देवी-देवतांचा जाहीर अपमान करणे हा इंडिया आघाडीचा राजकीय अजेंडा बनला आहे. या हेतूने भारत देशावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रविशंकर प्रसाद यांनी विचारले की, काँग्रेस आणि टीएमसी राजकारणात पुढे जाण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर उतरत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो.
अमित मालवीयही संतापले
तर दुसरीकडे भाजपा नेते अमित मालवीय यांनीही ए राजा यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अमित मालवीय यांनी ए राजा यांचे भाषण X सोशल मीडिया साइटवर शेअर केले आहे. याबरोबरच त्यांनी लिहिले की, द्रमुककडून द्वेषयुक्त भाषण सुरू आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म रद्द करण्याच्या आवाहनानंतर आता ए राजा भारताच्या फाळणीबद्दल बोलत आहेत. त्यांनी पुढे लिहिले की, ए राजा प्रभू रामाची खिल्ली उडवत आहेत. मणिपुरींवर अपमानास्पद टिप्पण्या करणे आणि एक राष्ट्र म्हणून भारताच्या कल्पनेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
ए राजा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ए राजा यांनी तमीळमध्ये दिलेल्या भाषणाचा व्हिडीओ अमित मालवीय यांनी शेअर केला आहे. ३ मार्च रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त कोईम्बतूर येथे आयोजित मेळाव्यात ए राजा बोलत होते. त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अमित मालवीय यांनी ए राजा यांच्या भाषणाचा इंग्रजी अनुवादही कॅप्शनमध्ये लिहिला आहे. त्यानुसार ए राजा आपल्या भाषणात भारत हा देश नाही, असे सांगत असल्याचं ते म्हणालेत. “भारत कधीही एक देश असू शकत नाही. एक देश असणे म्हणजे एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती आहे. त्यामुळे भारत हा देश नसून उपखंड आहे. पुढे ते म्हणतात की, तामिळनाडू हा देश आहे, कारण इथली एकच भाषा मल्याळम आहे. ओडिशा हा देश आहे, कारण तिथे एक भाषा आहे. हे सर्व देश मिळून एक भारत तयार करतात. म्हणूनच भारत हा देश नसून तो उपखंड आहे. येथे अनेक परंपरा आणि संस्कृती आहेत.”
ए राजा पुढे त्यांच्या भाषणात म्हणतात की, “तामिळनाडूची संस्कृती वेगळी, केरळची संस्कृती वेगळी आणि दिल्लीची संस्कृती वेगळी आहे. मणिपूरमध्ये लोक कुत्रे (श्वान) खातात ही त्यांची संस्कृती आहे. यात काही गैर नाही. हे सर्व फक्त आपल्या मनात आहे. ए राजा भगवान रामाबद्दल म्हणाले की, तो तुमचा देव आहे. तो देव आणि भारत माता आम्ही कधीच स्वीकारणार नाही. त्यांना सांगा, आम्ही सर्व रामाचे शत्रू आहोत. मी रामायण आणि भगवान राम मानत नाही”. यादरम्यान ए राजाने भगवान हनुमानाची तुलना माकडाशी केली आणि ‘जय श्री राम’चा नारा घृणास्पद असल्याचे वर्णन केल्याचंही अमित मालवीय यांनी सांगितलंय.
ए राजा यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. जगद्गुरु रामानुजाचार्य म्हणाले, राजाने असाही विचार केला पाहिजे की, संपूर्ण जग ‘राम मय’ आहे. वादग्रस्त विधाने करण्याची चढाओढ सुरू आहे. दक्षिण भारतात रावणाला मानण्याची परंपरा आहे. रावण आपल्या समोर प्रभू रामालाच पाहत होता, पण त्याचा (रावणाचा)सुद्धा भगवान रामांवर विश्वास नव्हता. पण शेवटचा श्वास घेताना रावणानेही ‘राम’ म्हटल्याचे शास्त्र सांगते, असंही जगद्गुरू रामानुजाचार्य यांनी अधोरेखित केले आहे.