पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केलेल्यांच्या यादीत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ हे भाजपाच्या रडारवर आहेत. हल्ल्यानंतर सध्या सुरू असलेल्या तणावाच्या काळात पाकिस्तानची भूमिका स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हल्ल्यानंतर वातावरण तणावग्रस्त असताना अनेक काँग्रेस नेत्यांनी वादग्रस्त विधानं केल्यामुळे भाजपाचा रोष वाढला आहे. दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा आणि पाकिस्तानला क्लीन चिट देण्याचा आरोप भाजपाने काँग्रेसवर केला आहे.
भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना सैफुद्दीन सोझ यांनी म्हटले की, “पाकिस्तानमध्ये सिंचन आणि पिण्याच्या उद्देशाने हे पाणी खूप महत्त्वाचे आहे. जर पाणी पुरेसे वळवले नाही तर जम्मू-काश्मीर पूर्णपणे बुडू शकते.” सोझ यांनी त्यांच्या विधानातून भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. “सिंधू पाणी करार भारत आणि पाकिस्तानमधील युद्धांमध्ये टिकून राहिला आहे. हा पाणी करार पाकिस्तानसाठी जीवनरेखा आहे. जर पाकिस्तानने पहलगाम हल्ल्यात सहभाग नसल्याचे सांगितले आहे तर आपण त्यांचा शब्द मान्य केला पाहिजे”, असे सोझ यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
सोझ यांनी केलेले हे वक्तव्य कर्नाटकचे मंत्री संतोष लाड यांच्यासारखेच आहे. त्यांनीदेखील पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्यासंदर्भातील केंद्राच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पाकिस्तानी लोकांना पाणी नसावे का, त्यांनी पाणी पिऊ नये का?” असं वक्तव्य लाड यांनी केलं होतं.
सोझ यांचा यु-टर्न
भाजपा आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी माजी केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. “पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याच्या पुराव्यांकडे भारताने दुर्लक्ष करावे, पाकिस्तानचा शब्द स्वीकारावा अशी त्यांची इच्छा आहे”, असे मालवीय म्हणाले. त्यानंतर सोझ यांनी त्यांच्या भूमिकेवरून यु-टर्न घेतला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ वेगळा लावला गेल्याचे त्यांनी सांगितले. सीएनएन-न्यूज-१८शी बोलताना काँग्रेस नेते म्हणाले की, “मी भारत सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे आणि फक्त पाकिस्तानने केलेल्या दाव्यांची सत्यता तपासण्याची विनंती केली होती.”
“मी असे म्हटले नाही की पाकिस्तानवर विश्वास ठेवला पाहिजे. मी शेवटी म्हटले आहे की, आपल्याला चर्चा आणि संवादाने ही प्रकरणे सोडवावी लागतील. माझी भूमिका पंतप्रधानांपेक्षा वेगळी असू शकत नाही”, असे सोझ म्हणाले.
भाजपाने काँग्रेसच्या टीकेवर लक्ष केंद्रित केले
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांच्या साखळीमुळे भाजपाचा रोष त्यांनी ओढवून घेतला आहे. “काँग्रेस आणि पाकिस्तान एकाच भाषेत बोलत आहेत, याबाबत खरंच कोणालाही आश्चर्य वाटते का?” असे मालवीय यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी या हल्ल्यासाठी हिंदुत्वाला जबाबदार धरल्यानंतर राजकीय वाद सुरू झाला. “सरकार हिंदुत्वाबद्दल बोलत आहे, त्यामुळे अल्पसंख्याक समाजात अस्थिरता निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यात अतिरेक्यांनी जर लोकांची ओळख विचारून हल्ला केला असेल तर हे दुर्दैवी आहे. त्यांनी हे का केले? कारण आपल्या देशात हिंदू आणि मुस्लीम यांच्यात दरी निर्माण झाली आहे”, असं वक्तव्य वाड्रा यांनी केलं होतं.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी युद्ध करण्याची गरज नाही, तर भारताने सुरक्षा वाढवावी असं वक्तव्य करत वाद निर्माण केला. त्यांनी या हल्ल्याबाबत बोलताना गुप्तचर यंत्रणेवर बोट ठेवत त्यांचे अपयश असल्याचे म्हटले. त्यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानी माध्यमांमध्येही संबंधित बातम्या प्रसारित झाल्या.
ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनीही २२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून आणखी एक वाद निर्माण केला. अय्यर म्हणाले की, “पहलगाम दुर्घटनेने फाळणीचे न सुटलेले प्रश्न प्रतिबिंबित केले.”
कर्नाटकचे उत्पादन शुल्क मंत्री आर बी तिम्मापूर यांनीही धक्कादायक विधान केलं. तिम्मापूर यांनी गोळी मारण्यापूर्वी दहशतवाद्यांनी धर्म विचारल्याचं तसंच हल्ल्यातून वाचलेल्यांच्या साक्षी फेटाळून लावल्या. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शिवमोग्गा मंजुनाथची पत्नी पल्लवी हिनं मानसिक नियंत्रण गमावल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं.
“दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का?” असे प्रश्न काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत. तसेच ते म्हणाले की, “काही पर्यटक सांगत आहेत की दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी लोकांना धर्म विचारला तर काही जण सांगतायत की असं काही घडलंच नाही. पहलगाममध्ये काश्मीर खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था का नव्हती? तिथली सुरक्षा व्यवस्था का हटवली? अतिरेकी देशाची सीमा ओलांडून २०० किलोमीटरपर्यंत आत घुसले आणि आपल्या लोकांना त्यांनी मारलं. हे सगळं होत असताना मोदी सरकार काय करत होतं? त्यांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती?” असेही वडेट्टीवार म्हणाले.