लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे. दरम्यान, गुरुवारी ४ एप्रिल रोजी १८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये केसी वेणुगोपाल, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि राजीव चंद्रशेखर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तसेच भाजपा नेते तेजस्वी सूर्या यांनी बंगळुरू दक्षिणमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेजस्वी सूर्यांच्या नामांकनावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते. तेजस्वी सूर्या यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात एकूण ४.१० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांची कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचंही तेजस्वी सूर्या यांनी स्पष्ट केलंय. भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांची संपत्ती २०१९ पासून १३ लाखांवरून ४.१० कोटींवर पोहोचली आहे. त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत घोषित केलेल्या १३ लाखांपेक्षा ही ३१५० टक्के जास्त आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत घोषित केलेल्या १३ लाख रुपयांपेक्षा त्यांची संपत्ती ३१.५ टक्के जास्त आहे. सूर्या यांची एकूण संपत्ती ४.१० कोटी रुपये आहे. त्यांनी म्युच्युअल फंडात १.९९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच १.७९ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स खरेदी केलेत. सूर्या यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले की, त्यांनी बहुतेक पैसे म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये गुंतवले होते आणि बाजारातील तेजीमुळे त्यांची संपत्ती वाढली आहे.
कोण आहेत तेजस्वी सूर्या?
२०१९ च्या निवडणुकीत तेजस्वी सूर्या दक्षिणेतील भाजपाचा तरुण आणि उज्ज्वल चेहरा म्हणून उदयास आले होते. त्यांनी कर्नाटकातील भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला तर वाचवलाच शिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांचाही पराभव केला. भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या (३३) पुन्हा एकदा बंगळुरू दक्षिणमधून निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे यावेळी त्यांच्यावरही विजयासाठी दबाव आहे. तेजस्वी सूर्या बीजेवायएमचे अध्यक्ष म्हणून खूप सक्रिय आहेत. ते भाजपाच्या युवा नेत्यांच्या आघाडीच्या फळीत येतात. १६ नोव्हेंबर १९९० रोजी कर्नाटकातील चिक्कमगालुरू येथे जन्मलेल्या तेजस्वी सूर्या यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील एल. ए. सूर्यनारायण हे उत्पादन शुल्क विभागात अधिकारी होते, तर तेजस्वी सूर्या यांचे काका राजकारणात आहेत. तेजस्वी यांच्यावर लहानपणापासूनच काकांचा प्रभाव होता. यामुळेच तेजस्वी सूर्या यांनी विद्यार्थीदशेपासूनच अभाविपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांची बोलण्याची क्षमता विकसित झाली.
…अन् ते विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक बनले
तेजस्वी सूर्या यांनी २०१८ मध्ये त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार केला, तेव्हा पक्षाच्या नेत्यांनी त्यांची दखल घेतली. परंतु त्यांना कर्नाटक निवडणुकीत प्रचाराची संधीही एका खास कारणामुळे मिळाली. २०१७ मधील मंगलोर चलो रॅली यशस्वी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या कारणास्तव ते आधी विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक बनले आणि नंतर २०१९ मध्ये बंगळुरू दक्षिणमधून पक्षाचे दिवंगत नेते अनंत कुमार यांच्या जागेवर तिकीट देण्याची वेळ आली, तेव्हा तेजस्वी सूर्या यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तेव्हा कर्नाटक भाजपासाठी हा अत्यंत धक्कादायक निर्णय होता. कर्नाटक युनिटच्या नेत्यांनी अनंत कुमार यांची पत्नी तेजस्विनी अनंत कुमार यांचे नाव पाठवले होते, परंतु तेजस्विनीने नंतर हायकमांडचा निर्णय मान्य केला होता. यामुळे तेजस्वी सूर्या वयाच्या २८ व्या वर्षी खासदार झाले.
भाजपाने २६ सप्टेंबर २०२० रोजी युवा मोर्चाची कमान त्यांच्याकडे सोपवली. तेजस्वी सूर्या यांचे पूर्ण नाव लक्ष्य सूर्यनारायण तेजस्वी सूर्य आहे. त्यांच्या वडिलांचे नाव एल. ए. सूर्यनारायण आणि आईचे नाव रमा आहे. सूर्या हे बंगळुरू इन्स्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीजचे माजी विद्यार्थी आणि कर्नाटक उच्च न्यायालयात वकील आहेत. ते भाजपा नेते आणि बसवनगुडीचे आमदार रवी सुब्रमण्यम यांचे पुतणे आहेत. ते बंगळुरू दक्षिणचे विद्यमान खासदार आहेत. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार हरिप्रसाद यांचा तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. २०२४ साठी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रात सूर्या यांनी सहा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक खाती असल्याचा उल्लेख केला आहे. तेजस्वी सूर्या यांच्याविरुद्ध तीन खटले प्रलंबित आहेत, तरीही त्यांना एकाही प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले नाही. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, सूर्या यांनी २०१३ मध्ये बंगलोर इन्स्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीज (बंगलोर विद्यापीठाशी संलग्न) मधून बॅचलर ऑफ आर्ट्स आणि कायद्याची पदवी घेतली आहे.
२०१९ मध्ये जेव्हा तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेस नेते हरिप्रसाद यांचा पराभव करून अनंत कुमार यांची जागा कायम ठेवली, त्यानंतर आरएसएसने त्यांचे नाव सुचवल्याचे उघड झाले होते. तसेच ते भाजपाच्या युवा आघाडीचे सरचिटणीस होते. त्यांचे काका रवी सुब्रमण्यम हे त्यावेळी बसवनगुडी येथून भाजपाचे आमदार होते. युवा खासदार झाल्यानंतर तेजस्वी सूर्या चार वर्षांत देशात आणि विशेषतः दक्षिणेत भाजपाचा उज्ज्वल चेहरा झाले. तेजस्वी सूर्या यांच्या विचारसरणीतही स्पष्टता आहे.
कुमारस्वामींकडून त्यांची कौटुंबिक संपत्ती २१७.२१ कोटी जाहीर
दुसरीकडे कुमारस्वामी यांनी त्यांची कौटुंबिक संपत्ती २१७.२१ कोटी जाहीर केली आहे, तर त्यांचे मेहुणे आणि हृदयरोगतज्ज्ञ सी. एन. मंजुनाथ हे भाजपाच्या तिकिटावर बंगळुरू ग्रामीणमधून लढत असून, त्यांनीसुद्धा एकूण ९८.३८ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे.