२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. त्यांनी आपल्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. मात्र भाजपाकडून इंडिया या नावाचा उल्लेख टाळण्याचा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाचे नेते ठिकठिकाणी देशाचे नाव घेताना इंडिया हे नाव वापरण्याचे टाळत आहेत. त्याऐवजी देशाचे नाव घेताना ते भारत हा शब्द वापरत आहेत. जी-२० शिखर परिषदेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिलेले होते. याच कारणामुळे मोदी सरकार लवकरच देशाच्या नाव फक्त भारत असे करणार असल्याची चर्चा रंगली आहे. असे असतानाच आता भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने देशाचे नाव भारत केले जाणार असून ज्या लोकांना हे नाव आवडलेले नाही, ते देश सोडून जाऊ शकतात, असे विधान केले आहे.

“सर्व परदेशी लोकांचे पुतळे हटवू”

पश्चिम बंगालमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनी वरील विधान केले आहे. ते भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिलेले आहेत. पश्चिम बंगालमधील खरगपूर शहरात ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी “आपल्या देशाला भारत असे नाव देण्यात येणार आहे. ज्या लोकांना हे आवडलेले नाही, ते देश सोडून जाऊ शकतात. त्यांना तशी मोकळीक आहे,” असे विधान केले. तसेच जेव्हा आमचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येईल तेव्हा कोलकाता शहरातील सर्व परदेशी लोकांचे पुतळे हटवण्यात येतील, असेही दिलीपी घोष म्हणाले.

“एका देशाला दोन नावे असू शकत नाहीत”

भाजपाचे अन्य नेते राहुल सिन्हा यांनीदेखील भारताचे नाव बदलण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. एका देशाला दोन नावे असू शकत नाहीत. दिल्लीमध्ये जी-२० परिषद होत असून देशाचे नाव बदलण्याची हीच योग्य वेळ आहे, असे सिन्हा म्हणाले.

“भाजपाला विरोधकांच्या इंडिया आघाडीची भीती”

दरम्यान, भाजपा नेत्यांच्या या विधानावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा हा पक्ष लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्य मुद्द्यांपासून लक्ष हटवले जात आहे. ते विरोधकांच्या इंडिया या आघाडीला घाबरले आहेत, अशी टीका तृणमूलचे प्रवक्ते शंतून सेन यांनी केली.

सोनिया गांधी यांचे मोदी यांना पत्र

दरम्यान, केंद्र सरकारने पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? हे अद्याप अनुत्तरीत आहे. या अधिवेशनाचा अजेंडा स्पष्ट नसल्यामुळे काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून सरकारने या अधिवेशनात मणिपूर हिंसा, मराठा आरक्षण, चीनच्या कुरापती या विषयांवर चर्चा करावी, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे या अधिवेशनात देशाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Story img Loader