“निवडणुकीचा काळ म्हणजे आमच्यासाठी घर सोडण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन राहण्याचा काळ असतो”, असे भाजपा कार्यकर्ते प्रशांत हलदर (३८) यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील बारुईपूर शहरातील भाजपा कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या डझनभर बेडपैकी एका बेडवर ते बसले होते. प्रशांत हलदर हे जादवपूर लोकसभा मतदारसंघातील बारुईपूरमधील भाजपाचे कार्यकर्ते आहेत. १ जून रोजी मतदान केल्यानंतर आपल्या पत्नी आणि मुलांसह त्यांनी घर सोडले आहे. पत्नी आणि मुलाला एका नातेवाईकांच्या घरी सोडून ते भाजपाच्या कार्यालयात आसरा घेत आहेत. त्यांच्यासारखीच परिस्थिती असणारे आणखी ५० जण पक्षाच्या कार्यालयात आसरा घेत आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होण्याचा इतिहास आहे. त्या पार्श्वभूमीवर, निवडणुकीनंतर भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घर आणि गाव सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला असल्याचे चित्र आहे. मात्र, हे पहिल्यांदाच असे घडते आहे असे नाही. याआधीही २०२१ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तसेच २०२३ च्या पंचायत स्तरावरील निवडणुकीवेळीही हीच परिस्थिती भाजपा कार्यकर्त्यांवर ओढावली होती.
हेही वाचा : राजकीय क्षितीजावर अस्त ते पुन्हा दमदार ‘एंट्री’; चंद्राबाबू नायडूंनी ‘टीडीपी’ला कशी दिली उभारी?
कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी (६ जून) पश्चिम बंगाल पोलिसांना मतदानानंतर घडणाऱ्या हिंसाचारातील पीडितांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी म्हणून नवीन ईमेल आयडी उघडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जवळपास एक हजार भाजपा कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागत आहे. बहुतांश कार्यकर्त्यांसाठी पक्षाचे कार्यालय हेच सुरक्षित ठिकाण आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने बारुईपूर आणि कोलकाता अशा दोन ठिकाणी भाजपा कार्यालयांना भेटी देऊन याबाबतची इत्यंभूत माहिती मिळवली आहे. बारुईपूरमधील भाजपाच्या पक्ष कार्यालयामध्ये, प्रशांत हलदर आणि त्यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते जमा होऊन टीव्हीवर नरेंद्र मोदींचे भाषण ऐकत होते. कार्यालयातील या मोठ्या खोलीमध्ये मोदी, अमित शाह आणि भाजपाचे जादवपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिर्बन गांगुली यांची मोठमोठी छायाचित्रे लावण्यात आली होती. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सायोनी घोष यांनी जाधवपूर मतदारसंघातून गांगुली यांचा २,५८,२०१ मतांनी पराभव केला आहे. कामगार म्हणून काम करणारे प्रशांत हलदर म्हणाले की, “२०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तसेच त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या पंचायत निवडणुकीनंतर मला घर सोडावे लागले होते. मी या वर्षी एप्रिलमध्ये घरी परत येऊ शकलो होतो, पण आता पुन्हा एकदा मी बेघर झालो आहे.” तुम्हाला कशामुळे घर सोडावे लागते, या प्रश्नावर ते म्हणाले की, “मला आणि माझ्या गावातील इतर कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी धमक्या आल्या होत्या. तरीही मी पक्षासाठी काम केले. मात्र, शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर २ जून रोजी मी घर सोडले. माझ्या घराची तोडफोड झाली असल्याचे मला नंतर कळले.”
प्रशांत हलदर यांच्या बाजूलाच ३६ वर्षीय मामोनी दास बसल्या होत्या. २०१६ पासून त्यांनाही अशाच प्रकारे घर सोडावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या. “२०१६ च्या विधानसभा निवडणुकीनंतर, मला स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी माथेरदिघी गावातील माझ्याच घरातून बाहेर काढले. त्यानंतर मी सहापारा आणि नंतर काठपोल येथे भाड्याच्या घरात राहिले, पण तरीही आम्हाला धमक्या येतच होत्या.” मोमोनी या भाजपाच्या बारुईपूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, “मी १ जून रोजी माझ्या गावी जाऊन मतदान केले. ४ जूनच्या रात्री माझ्या घराला ५० हून अधिक गुंडांनी घेरले होते. मी लपून बसले, पण गुंडांनी माझ्या पतीला आणि माझ्या आईला मारहाण केली. या मारहाणीमध्ये दोघेही जखमी झाले आहेत. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही पुन्हा घर सोडले आणि मी दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हापासून हे पक्ष कार्यालयच आमचे घर झाले आहे.” विद्याधारी पल्ली येथे ई-रिक्षाचालक म्हणून काम करणाऱ्या बिकाश रॉय (३८) यांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा असलेल्या गुंडांनी त्यांची ई-रिक्षा हिसकावून घेतली. त्यानंतर जीवाच्या भीतीने ते पळून आले. ते म्हणाले की, “निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम्हाला पुन्हा याची जाणीव झाली की, तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्या घरांवर हल्ला करू शकतात. ते माझ्या घरी आले होते आणि त्यांनी आम्हाला धमकावले होते. त्यांनी कुलूप तोडून माझी टोटो (ई-रिक्षा) पळवून नेली. आता मी माझा उदरनिर्वाह कसा भागवणार? त्या रात्रीच मी घर सोडून इकडे आलो. माझी पत्नी आणि मुले आता नातेवाईकांच्या घरी आहेत.” बारुईपूरमधील भाजपाच्या या तीन मजली कार्यालयामध्ये जवळपास ५० कार्यकर्त्यांनी आसरा घेतला आहे. २०२१ पासून प्रत्येक निवडणुकीनंतर पक्षाचे हे कार्यालय म्हणजे कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठीचा निवारा घर ठरते. बारुईपूरपासून ४५ किमी लांब असणाऱ्या कोलकातामध्येही हीच परिस्थिती आहे. भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाजवळील इमारतीमध्ये पक्षाचे १०० कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय आसरा घेत आहेत. या इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पलंगांची रांग आहे. उत्तर २४ परगणा येथील मिनाखान-१ मंडोलचे भाजपा युवा मोर्चाचे सचिव शानू प्रामाणिक आणि इतर पाच तरुण कार्यकर्ते काल शुक्रवारी (७ जून) सुरक्षिततेसाठी इथे आले आहेत.
हेही वाचा : कोण आहेत लोकसभेचे ७ अपक्ष खासदार? त्यांची साथ एनडीएला की इंडिया आघाडीला?
२०१४ साली माकपमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या ३१ वर्षीय शानू यांनी आपली व्यथा सांगितली. ते म्हणाले की, “४ जून रोजी निकाल लागल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या घरांची तोडफोड केली. ते घराच्या आत येण्याआधीच मी पळून गेलो. त्यानंतर आम्ही आमच्या नातेवाईकांच्या घरी आसरा घेतला. आज पहाटे ३ वाजता आम्ही तिथून निघालो आणि दुपारी १ वाजता इथे पोहोचलो. माझे कुटुंबीय अजूनही तिथे आहे. परत आल्यास ठार मारले जाईल, अशा धमक्या येत असल्याने कुटुंबीयांनी आम्हाला परत न येण्यास सांगितले आहे.” भाजपाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) या विद्यार्थी संघटनेचे नेते बिष्णू ढाली (२६) यांनी सांगितले की, “आम्ही बशीरहाट लोकसभा मतदारसंघामधील बूथ एजंट होतो. ज्या पाच मतदान केंद्रांवर भाजपाला आघाडी आहे, तिथेच आम्ही बूथ एंजट असल्याने आम्हाला आता लक्ष्य केले जात आहे. निकालानंतर मी पळून गेल्याने त्यांना मी सापडलो नाही. पण, त्यांनी माझ्या मावशीला बेदम मारहाण केली आहे. त्यांनी आमच्या घराचीही तोडफोड केली आहे.” बशीरहाट जागेवर तृणमूल काँग्रेसच्या एस. के. नुरुल इस्लाम यांनी भाजपाच्या रेखा पात्रा यांचा ३,३३,५४७ मतांनी पराभव केला आहे. दुसऱ्या बाजूला तृणमूल काँग्रेस पक्षाने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनी म्हटले की, “हे सर्व खोटे आरोप आहेत. प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा या गोष्टी करत आहे. विरोधकांवर कोणत्याही प्रकारचे हल्ले आम्ही होऊ देणार नाही, असे विधान तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी केले आहे.”