माजी भारतीय क्रिकेटपूट तथा बीसीसीआचे माजी अध्यक्ष सौरव गांगूली हे कायमच चर्चेत असतात. ते मूळचे पश्चिम बंगालचे असून याआधी ते भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह तसेच तृणमूल काँग्रेसच्या नेत्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत अनेकदा दिसलेले आहेत. याच कारणामुळे सौरव गांगुली बंगालच्या राजकारणात उडी घेणार का? असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या सरकारने सौरव गांगुली यांची पश्चिम बंगालचे सदिच्छादूत म्हणून नेमणूक केली आहे. याआधी अभिनेता शाहरुख खान पश्चिम बंगालचा सदिच्छादूत (ब्रँड अँबेसेडर) होता. ममता यांच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे.
सौरव गांगुली यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयचे अध्यक्ष होते. बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायऊतार झाल्यानंतर साधारण वर्षभरानंतर ममता बॅनर्जी यांनी गांगुली यांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली आहे. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्या शिष्टमंडळात गांगुली यांचा समावेश होता. काही महिन्यांपूर्वी सौरव गांगुली हे भाजपाचे नेते अमित शाह यांच्यासोबत भोजन करताना दिसले होते. याच कारणामुळे सौरव गांगुली नेमके कोणत्या बाजूने आहेत, असे विचारले जात आहे.
…अन् सर्व अंदाज फोल ठरले
पश्चिम बंगालच्या २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीत गांगुली हे भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरा असल्याचे म्हटले जात होते. भाजपा सत्तेत आल्यास गांगुली यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आणि सर्व अंदाज फोल ठरले. त्या काळात सौरव गांगुली यांचे भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी, सुकांता मुजूमदार आदी नेत्यासोबतच्या भेटीचे फोटोही समोर आले होते. मात्र ऑक्टोबर २०२२ मध्ये सौरव गांगुल यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि भाजपाची त्यांच्याशी असलेली कथित जवळिक संपुष्टात आली.
सौरव गांगुली, ममता बॅनर्जी याआधी एकाच मंचावर
काही महिले उलटल्यानंतर सौरव गांगुली हे ममता बॅनर्जी यांच्यासोबतही दिसले होते. सप्टेंबर २०२२ मध्ये युनेस्कोकडून बंगालच्या दुर्गा पूजा उत्सवाला हेरिटेज टॅग मिळाला होता. त्यानंतर आभार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सौरव गांगुली आणि ममता बॅनर्जी एका मंचावर होते. त्यानंतरही गांगुली नेमके कोणत्या बाजूने आहेत, असा प्रश्न विचारला जात होता.
ममता बॅनर्जींनी केले सौरव गांगुलीचे तौंडभरून कौतुक
दरम्यान, सौरव गांगुली यांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. “सौरव गांगुली हे खूप प्रसिद्ध आहेत. तरुणांमध्ये तर ते फारच लोकप्रिय आहेत. मला जाहीर करायला आनंद होत आहे की, सौरव गांगुली हे पश्चिम बंगालचे नवे सदिच्छादूत असतील. गांगुली यांनी सदिच्छादुताची जबाबदारी स्वीकारावी,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
सौरव गांगुली यांनी केले ममता बॅनर्जींचे कौतुक
सौरव गांगुली यांनीदेखील आपल्या भाषणात ममता बॅनर्जी यांचे तोंडभरून कौतुक केले. “मी जेव्हा जेव्हा ममता बॅनर्जी यांना मेसेज करतो, तेव्हा-तेव्हा त्या मला तत्काळ प्रतिसाद देतात. माझ्या मेसेजचे त्या अपवादानेच उशिराने उत्तर देतात. त्या जेव्हा मला टीव्हीवर पाहतात, तेव्हा आवर्जून कॉल करतात. जेवलास का, तब्येत कशी आहे, असे आस्थेवाईकपणे विचारतात,” असे सौरव गांगुली म्हणाले.
भाजपाची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका
भाजपाने मात्र सौरव गांगुली यांच्या नियुक्तीनंतर ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. “सौरव गांगुली यांना मानाचे स्थान देण्यास ममता बॅनर्जी तसेच तृणमूल काँग्रेसने फार उशीर केला. सौरव गांगुली यांनी पश्चिम बंगालसाठी खूप काही केलेले आहे. मात्र आता २०२४ सालाची निवडणूक पाहता बॅनर्जी यांनी गांगुली यांच्याकडे सदिच्छादुताची जबाबदारी सोपवली आहे. ममता बॅनर्जी यांना सौरव गांगुली यांचा २०२४ सालच्या निवडणुकीत उपयोग करून घ्यायचा आहे. आता शाहरुख खानची उपयोगिता संपली आहे,” असे भाजपाचे नेते दिलीप घोष म्हणाले.
दरम्यान, भविष्यात सौरव गांगुली राजकारणात येणार का? या प्रश्नाचे उत्तर अद्याप अनुत्तरीत आहे. मात्र राजकारणात यायचे की नाही, हा सर्वस्वी सौरव गांगुली यांचा निर्णय आहे, अशी भूमिका तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे.