पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. येथे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे. आतापर्यंत येथे साधारण १२ जणांचा मृत्य झाला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर तेथील राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गरिबीला मारण्याऐवजी आपण गरीब लोकांना मारत आहोत, असे बोस म्हणाले.
हिंसाचारात १२ जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये ८ जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. मात्र मतदारानदरम्यान येथे ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. यामध्ये एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या आठ कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
अशांततेचा परिणाम आगामी पिढ्यांवर- बोस
“सगळीकडे हिंसाचार आहे. ठिकठिकाणी खुनाच्या घटना घडत आहेत. सगळीकडे धमकी, जबरदस्ती सुरू आहे. आपण देशातील गरिबीला मारायला हवे. मात्र आपण गरिबांनाच मारतो आहोत. पश्चिम बंगालला हे सर्व नको आहे. सध्याच्या अशांततेचा परिणाम आगामी पिढ्यांवर होणार आहे,” अशी भावना बोस यांनी व्यक्त केली. राज्यात हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर त्यांनी बाहेर पडत हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिली. त्यानंत ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.
युद्ध नको, शांतता हवी- बोस
यावेळी बोलताना “राजकारण करायला हवे. मात्र राजकारणात हिंसाचाराचा समावेश नसावा. हिंसाचार हा आमचा किंवा तुमचा नसतो. हिंसा ही हिंसाच असते. हिंसाचार घडवणाऱ्यांना खून व्हावेत असे वाटत आहे. त्यांना उपासमार हवी आहे. त्यांना गोळीबार हवा आहे. युद्धापेक्षा आप शांतता प्रस्थापित करायला हवी,” असेही बोस म्हणाले.
बोस यांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील एका रुग्णालयाला भेट देत हिंसाचारामध्ये जखमी झालेल्यांशी बातचित केली. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त राजीव सिन्हा यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.
“लोकांना मरेपर्यंत मारहाण केली जात आहे”
“राज्यात खून होत आहेत, असे मला सांगण्यात आले. गोळीबार होत आहे. लोकांना मरेपर्यंत मारहाण केली जात आहे. या घटना तुरळक आहेत. मात्र राज्यात एका व्यक्तीसोबत जरी असे घडत असेल, तरीदेखील ती चिंतेची बाब आहे. मतदानाचा दिवस हा लोकशाहीत सर्वांत पवित्र असतो. सामान्य माणसाला संविधानाने मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या दिवशी लोक आपला हा अधिकार बजावतात. कोणत्याही दबावाला बळी न पडता निवडणूक घेतली पाहिजे. निवडणुकीशी संबंधित काही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मी त्या निवडणूक आयुक्तांकडे पाठवल्या आहेत. लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावे,” असे बोस म्हणाले.
बोस यांनी हिंचाराग्रस्त भागाला दिली भेट
उत्तर २४ परगणामधील बराकपूर शहराला भेट दिल्यानंतर बोस यांनी कदंबगाची तसेच नादिया जिल्ह्यातील कल्याणी भागाला भेट दिली. कदंबगाजी या भागात त्यांनी हिंसाचारात जखमी झालेल्या अब्दुला नावाच्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अब्दुला यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. या भेटीनंतर अब्दुल्ला यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “बोस यांनी भेट दिल्यानंतर घराबाहेर पडून मतदान करण्याची आमची हिंमत झाली. बोस यांच्या भेटीनंतर जवानदेखील मतदान केंद्राचे संरक्षण करण्यासाठी आले होते. पोलिसांनीही वेळोवेली पहारा दिला,” अशी प्रतिक्रिया रोसेनारा बीबी यांनी दिली.
राजभवनात पीस होमची स्थापना
दरम्यान, या हिंसाचारानंतर बोस यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकले नाहीत, अशा भावना व्यक्त केल्या. त्यांनी लोकांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी राजभवनात ‘पीस होम’ सुरू केले आहे.